Manoj Jarange Patil Audio Clip Pudhari
छत्रपती संभाजीनगर

Manoj Jarange Patil: 'जरांगेंना डॅमेज करा, गाड्यांचा अन्...', जरांगेंनी पत्रकार परिषदेत ऐकवली ऑडिओ क्लिप, कोणाचं नावं घेतलं?

Manoj Jarange Audio Clip: मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत एक ऑडिओ क्लिप ऐकवून मराठा आरक्षण आंदोलन कमकुवत करण्याचा कट रचल्याचा आरोप केला.

Rahul Shelke

Manoj Jarange Audio Clip: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये जरांगे यांचा प्रभाव कमी करण्यासाठी भाजपमधील मराठा नेत्यांना पुढे करणे, त्यांच्याविरोधात वातावरण तयार करणे आणि त्यासाठी वैयक्तिक निधीतून खर्च करण्याबाबत चर्चा झाल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाची पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घ्यावी, अशी मागणीही जरांगे यांनी केली.

‘गेल्या तीन वर्षांपासून माझ्याविरोधात षड्यंत्र’

पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या तीन वर्षांपासून आपल्याला आणि मराठा आरक्षण आंदोलनाला बदनाम करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. गरीब मराठा समाजातील मुलांना आरक्षणाचा न्याय मिळू नये आणि आंदोलन कमकुवत व्हावे, यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न झाल्याचा दावा त्यांनी केला.

“मी भाजपकडून पैसे घेतले नाहीत किंवा कोणाला पैसे दिले नाहीत. तरीही माझ्याविरोधात ५०० कोटी रुपयांच्या निधीचा आरोप करून बदनामी करण्याचा प्रयत्न झाला,” असे जरांगे म्हणाले.

आपल्याविरोधात षड्यंत्र रचणाऱ्यांनी आता या ऑडिओ क्लिपमधील संभाषण ऐकावे, असे आव्हानही त्यांनी दिले. या प्रकरणातील सत्य समोर यावे आणि मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.

ऑडिओ क्लिपमध्ये नेमकी काय चर्चा?

पत्रकार परिषदेत जरांगे यांनी मोबाईलवरून एक ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये भाजपच्या वर्तुळातील व्यक्तींचे संभाषण असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, या क्लिपमधील व्यक्तींची ओळख आणि संभाषणाची सत्यता स्वतंत्रपणे पडताळली नाही.

जरांगेंचा मराठा समाजातील वाढता प्रभाव कमी करण्यासाठी भाजपमधील मराठा नेत्यांना पुढे करण्याबाबत या संभाषणात चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले आणि नरेंद्र पाटील यांच्यासारख्या नेत्यांची नावेही संभाषणात आहेत.

जरांगे हे शेती, कर्जमाफी आणि मराठा समाजाच्या प्रश्नांवरून जनमत तयार करत आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेला थेट उत्तर देण्याऐवजी त्यांच्याविरोधात वातावरण तयार करण्याची गरज असल्याचे या संभाषणात म्हटल्याचा दावा करण्यात आला.

"जरांगे भाजपला 'मराठाद्रोही' ठरवत आहेत आणि त्याचा प्रभाव समाजात पडतोय. प्रवीण दरेकर किंवा नारायण राणे यांच्यासारख्या नेत्यांचे बोलणे बाजूला ठेवू; पण शिवेंद्रराजे भोसले यांचा व्हिडिओ केला तसाच मुद्दा पुढे करून खासदार उदयनराजे भोसले किंवा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षांना (नरेंद्र पाटील) बोलतं केले पाहिजे. भाजपमधील मराठा चेहऱ्यांनी समोर येऊन जरांगेंना उत्तर दिले पाहिजे."

जरांगेंविरोधात बोलणाऱ्यांचा खर्च उचलण्याची चर्चा?

या ऑडिओ क्लिपमधील सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे जरांगे यांच्याविरोधात बोलणाऱ्या व्यक्तींना आर्थिक मदत करण्याबाबतचा दावा.

क्लिपमध्ये जरांगे यांच्या विरोधात बोलण्यास तयार असलेल्या मराठा नेत्यांना एकत्र आणणे, त्यांना सक्रिय करणे आणि त्यांच्या गाड्या तसेच मोर्चांचा खर्च उचलण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. पक्षाच्या निधीतून खर्च करणे शक्य नसेल, तर वैयक्तिक निधीतून मदत करण्याचा पर्यायही संभाषणात मांडल्याचा दावा आहे.

या चर्चेवरून मराठा समाजातील काही नेत्यांना पुढे करून जरांगे यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप जरांगे यांनी केला.

"जरांगे शेती, कर्जमाफी अशा वेगवेगळ्या मुद्द्यांना हात घालत नॅरेटिव्ह तयार करत आहेत आणि आपण फक्त त्याला उत्तरे देत बसतो. त्यामुळे त्यांना थेट तोंड देण्यापेक्षा त्यांच्याविरोधात वातावरण निर्मिती झाली पाहिजे."

"निरंजन डावखरे जेव्हा आले होते, तेव्हा जरांगेंच्या विरोधातील 2 ते 4 मराठा लोकांशी त्यांचे बोलणे करून दिले आहे. दरेकरांशी एक ग्रुप सोडून दिला आहे. आपण सुचिता आणि पावित्र्य पाळण्याच्या नादात आपले राजकीय नुकसान (डॅमेज) होत आहे."

‘आता या आरोपांना उत्तर द्यावे लागेल’

ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर जरांगे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट सवाल केले. मराठा समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न कोण करत आहे आणि आंदोलनाला विरोध करण्यासाठी आर्थिक मदत देण्याची चर्चा कोणी केली, याचे उत्तर मिळाले पाहिजे, असे ते म्हणाले.

“माझ्यावर ५०० कोटी रुपयांचे आरोप करणाऱ्यांनी आता या ऑडिओ क्लिपमधील संभाषणावरही उत्तर द्यावे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.

आपण गरीब मराठा समाजातील मुलांना आरक्षण मिळावे यासाठी लढत आहोत. मात्र, या आंदोलनाला बदनाम करण्याचे आणि आपल्याला लक्ष्य करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT