मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करताना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व पोलिस अधीक्षक तेगबीर सिंग संधू. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Maratha reservation protest : अधिकाऱ्यांसोबत चर्चेला जरांगेंचा नकार

अंतरवालीतील उपोषणाचा चौथा दिवस : सरकारच्या शिष्टमंडळानेच चर्चेला यावे - जरांगे आम्ही मसुदा दिलाय, बदल कळवावे, तोपर्यंत चर्चा काय करणार - मंत्री विखे पाटील

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर / जालना : : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवालीत मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांच्या मागण्यांवरील तोडग्याचा मसुदा घेऊन शासनाने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलिस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांना मंगळवारी (दि १) रात्री अंतस्वालीत पाठविले. मात्र, जरांगे यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार नाही, सरकारच्या शिष्टमंडळानेच चर्चेला यावे, अशी भूमिका घेतली. तर आम्ही जरांगे यांच्याकडे शासनाच्या प्रतिनिर्थीमार्फत मसुदा पाठविला आहे. त्यावर त्यांनी त्रुट्या, उणिवा सकाळपर्यंत कळवाव्यात, तोपर्यंत चर्चेला जाऊन उपयोग काय, असे मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासह इतर मागण्यांकरिता गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषणास बसले आहेत. मंगळवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची प्रकृत्ती अधिकच खालावली. गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने मराठा समाजबांधव अंतरवाली सराटीत येत आहेत.

जरांगे यांची प्रकृती खालावल्याने मराठा आंदोलकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. त्यात मंगळवारी दुपारी सरकारचे प्रतिनिधी तथा मराठा उपसमितीचे अध्यक्ष विखे पाटील, मंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी संभाजीनगर-जालना मार्गावर केंब्रीज शाळेजवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये अधिकाऱ्यांसोबत मसुद्यावर चर्चा केली. त्यांच्याकडून मराठा आरक्षणाबाबत आढावा घेतला.

या बैठकीनंतर शासनाचे प्रतिनिधी म्हणून रात्री उशिरा जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मितल व पोलिस अधीक्षक तेगबीर सिंग संधू यांनी जरांगे यांची भेट घेतली. यावेळी जरांगे यांनी आपण आपल्या मागण्यांसंदर्भात केवळ सरकारशीच बोलणार असल्याचे स्पष्ट भूमिका शासनाच्या प्रतिनिधींपुढे मांडली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे शिष्टमंडळाला काहीही बोलले नाही.

दरम्यान, रात्री उशिरा मंत्री विखे पाटील, मंत्री सामंत आणि आमदार लाड यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सरकारला जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी वाटते असे सांगत मंत्री विखे म्हणाले, आम्ही जरांगे यांना मसुदा पाठविला आहे. त्यांनी यात त्रुट्या, उणिवा काय आहेत त्या सूचवाव्यात, त्यानुसार बदल करू, सरकार त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक आहे, असेही विखे पाटील म्हणाले. जिल्हाधिकारी हे शासनाचे प्रतिनिधी म्हणूनच त्यांच्या भेटीला गेले होते. आता मसुदा त्यांना पाठविला आहे. त्यावर त्यांचे उत्तर अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. तर मंगळवारी शिष्टमंडळ परतल्यानंतरही आल्याने मनोज जरांगे यांचे उपोषण सुरूच आहे.

जरांगेनी बोलताना विचार करावा

बोलण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तींवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी विचार करावा, असे आम्हाला वाटते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री विखे पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडविस यांनी सकारात्मक काम केले आहे, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.

५८ लाख नोंदी

मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात ५८ लाख माराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत. त्यानुसार प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी केली आहे, त्यावर विखे पाटील म्हणाले, ५८ लाख नोंदी ग्रामपंचायतसमोर मांडू, मात्र लोकांनी अर्ज करायला हवे.

अधिकाऱ्यांशी चर्चेला नकार

मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आणि सरकारने तयार केलेला मसुदा देण्यासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल व पोलिस अधीक्षक तेगबीर सिंग संधू हे गेले होते. परंतु, त्यांनी शिष्टमंडळाशी चर्चेला नकार दिला. त्यानंतर उपोषण सुरूच ठेवले. सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्र्यांनी चर्चेला यावे, अशी भूमिका जरांगे यांची आहे.

मसुद्यावरील प्रतिसादानंतरच पुढचा निर्णय

मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यानुसार सरकारने जो मसुदा तयार केला. हा मसुदा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत त्यांना पाठविला आहे. त्यांनी मसुद्यावर चर्चा केल्यानंतरच पुढचा निर्णय घेता येईल, असे मंत्री उदय सामंत म्हणाले. तर सकाळपर्यंत जरांगे यांनी मसुद्यावर उत्तर द्यावे, असे आमदार प्रसाद लाड म्हणले.

सोलापूर-धुळे महामार्गावर टायर पेटवले

बीड : मनोज जरांगे पाटील हे सराटी अंतरवाली येथे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाची दखल शासनाने घ्यावी या मागणीसाठी सोलापूर-धुळे महामार्गावर पाडळशिगी नजीक मराठा आंदोलकांनी टायर पेटवत रास्ता रोको आंदोलन केले. परंतु पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्यानंतर आंदोलक निघून गेले.

मनोज जरांगे पाटील हे २९ ऑगस्टपासून सराटी अंतरवाली येथे आंदोलन करत आहेत. त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी या मागणीसाठी बीडमधून खा. बजरंग सोनवणे, आ. विजयसिंह पंडित, आ. संदीप क्षीरसागर यांनी मुख्यमंत्र्यांना यापूर्वीच पत्र पाठवलेले आहेत. तर दुसरीकडे उपोषणाच्या चौथ्या दिवशीही शासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने बीडमध्ये मराठा आरक्षण प्रश्नावर आंदोलक आक्रमक झाले आहेत.

मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सोलापूर-धुळे महामार्गावर पाडळशिंगी टोलनाक्यानजीक काही आंदोलक एकत्र आले, त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने आंदोलक तेथून निघून गेले. दरम्यान, यापूर्वी देखील बीडमध्ये मोठे आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (दि. ३) बीड जिल्हा बंदची हाक देणाऱ्या पोस्ट सोशल मीडिया द्वारे केल्या जात आहेत.अनेक मराठा आंदोलकांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या पोस्ट शेअर केल्या आहेत. याबाबत अधिकृत भूमिका अद्याप कोणी जाहीर केली नसली, तरी पोस्टच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT