Mangalsutras of 30 women stolen amidst the massive crowd at 'Prati-Pandharpur'
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज परिसरातील श्रीक्षेत्र प्रतिपंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त भरलेल्या यात्रेमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीत साखळी चोरांनी धुमाकूळ घातला. दर्शनाच्या रांगेत आणि गर्दीत तब्बल ३० महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रे कापून लंपास केली. पोलिसांचा तगडा बंदोबस्त असतानाही इतर शासकीय विभागांनी सुरक्षेच्या सूचनांचे पालन न केल्याने प्रशासकीय समन्वयाचा अभाव दिसून आला. या असहकार्याची गंभीर दखल घेत शहर पोलिस आता संबंधित विभागांबाबत थेट पोलिस महासंचालक आणि राज्य शासनाकडे सविस्तर अहवाल सादर करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, यात्रेत दर्शनासाठी आलेल्या महिलांचे मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात येताच ३० महिलांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे या सर्व महिलांच्या तक्रारींची दखल घेत नोंद केली. मात्र रविवारी (दि.२६) सायंकाळपर्यंत यापैकी केवळ एकाच महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला असून, उर्वरित प्रकरणांची चौकशी सुरू आहे.
यात्रेच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी मोठा फौजफाटा आणि 'हायटेक' यंत्रणा तैनात केली होती. यात पोलिस उपायुक्त, सहायक आयुक्तांसह १५ पोलिस निरीक्षक, ४० सपोनि-पोउपनि, ६०० अंमलदार, ५०० होमगार्ड, एसआरपीएफची एक तुकडी आणि ३५० स्वयंसेवकांचा समावेश होता. संपूर्ण मंदिर परिसरात ४०० अत्याधुनिक 'एआय' आधारित फेस रेकमिशन कॅमेरे बसवण्यात आले होते. या हायटेक कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीतील संशयास्पद हालचाली टिपून ६ सराईत संशयितांना हेरून ताब्यात घेण्यात आले. तसेच गुन्हे शाखा, दामिनी पथक आणि स्थानिक पोलिसांनी कारवाई करत ८ संशयित महिलांसह इतर ६ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
इतर विभागांच्या असहकार्यावर पोलिस दल नाराज यात्रेतील वाढती गर्दी आणि संभाव्य धोके लक्षात घेऊन पोलिस प्रशासनाने आधीच विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठका घेतल्या होत्या. यात ग्रामपंचायत, मंदिर समिती, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआयडीसी, जागतिक बँक प्रकल्प, महावितरण आणि महसूल विभागाचा समावेश होता.
या बैठकांमध्ये पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र अन्य विभागांनी सूचना गांभीर्याने घेतल्या नाही. या असहकार्यामुळे गर्दी व्यवस्थापनात अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. या निष्काळजीपणाचा सविस्तर अहवाल आता थेट पोलिस महासंचालव आणि शासनाकडे पाठवण्यात येणार असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
एकमेकांकडे टोलवाटोलवी, पोलिसांनीच टाकला मुरूम
सूत्रांनी सांगितले की, विद्युत डीपी काढण्यासाठी सूचना दिल्या तेव्हा डीपी तर काढली, मात्र त्याचे पोल तसेच ठेवले. दुसरीकडे एका ठिकाणी मुरूम टाकण्यासाठी पोलिसांनी सांगितले असता ही जागा आमच्याकडे नाही म्हणत काही विभागांनी टोलवाटोलवी केल्याने अखेर पोलिसांनीच तिथे मुरूम टाकून प्रश्न मार्गी लावला. अशा अनेक गोष्टी घडल्याचे पोलिस दलातील सूत्रांनी सांगितले.