छत्रपती संभाजीनगर : जवाहरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळसूत्र चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या भागात यापूर्वीही अशा घटना सातत्याने घडल्या आहेत, तरीही पोलिसांची गस्त केवळ नावालाच उरली आहे. आजवर एकाही चोरट्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
पोलिसांच्या या निष्क्रियतेचा प्रत्यय गुरुवारी (दि.४) सकाळी पुन्हा एकदा आला असून, देवदर्शनाला जाणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे गंठण दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना देशमुखनगर येथील जैन मंदिराजवळ सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली.
फिर्यादी हेमलता बाबुलाल लोहाडे (६१, रा. मोर्या मंगलकार्यालयाजवळ, शिवाजीनगर) यांच्या तक्रारीनुसार, त्या गुरुवारी सकाळी ७.२० वाजेच्या सुमारास घरून देशमुखनगर येथील जैन मंदिरात देवदर्शनासाठी एकट्याच पायी निघाल्या होत्या. ७:३० वाजेच्या सुमारास समोरून एका स्पोर्ट्स बाईकवर दोन तरुण आले. त्यांच्यापैकी दुचाकी चालवणाऱ्याने डोक्यात टोपी घातली होती, तर पाठीमागे बसलेल्या तरुणाने काळा शर्ट व काळी पँट घातली होती.
या दुचाकीस्वारांनी हेमलता यांच्या जवळ येताच, मागे बसलेल्या चोरट्याने अचानक त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याचे मिनी गंठण हिसकावले. अवघ्या काही सेकंदांत हा प्रकार घडला. त्यानंतर हे दोन्ही चोरटे गोल्डन केअर हॉस्पिटलच्या दिशेने वेगात पळून गेले. जवाहर नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक मारोती खिल्लारे करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.