प्रातिनिधिक छायाचित्र   File Photo
छत्रपती संभाजीनगर

Crime News : पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या नराधम पतीला जन्मठेप

मृत रेशमा (२३) हिचे घटनेच्या सुमारे सहा महिन्यांपूर्वी आरोपी लईक जावेद अन्सारी (रा. इंदिरानगर, कन्नड) याच्याशी दुसरे लग्न झाले होते.

पुढारी वृत्तसेवा

Man sentenced to life imprisonment for strangling wife to death

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सातत्याने शारीरिक व मानसिक छळ केल्यानंतर पत्नीचा गळा आ-वळून खून केल्याप्रकरणी आरोपी पती लईक जावेद अन्सारी (३६, रा. कुंजखेडा, ता. कन्नड, ह.मु. मोहमदिया मशीदचे बाजूला, कन्नड) याला जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. डी. खेडेकर यांनी ९ फेब्रुवारी रोजी ठोठावली.

मृत रेशमा (२३) हिचे घटनेच्या सुमारे सहा महिन्यांपूर्वी आरोपी लईक जावेद अन्सारी (रा. इंदिरानगर, कन्नड) याच्याशी दुसरे लग्न झाले होते. पहिल्या लग्नातून तिला पाच वर्षांची मुलगी असून, कौटुंबिक वादामुळे ती पहिल्या पतीपासून वेगळी झाली होती. दुसऱ्या लग्नानंतर काही काळातच पतीकडून शिवीगाळ व मारहाण सुरू झाल्याची माहिती रेशमाने वारंवार माहेरच्यांना दिली होती.

मुलीच्या तक्रारीनंतर दोन्ही कुटुंबीयांची बैठक घेऊन प्रकरण मिटविण्यात आले होते. मात्र त्यानंतरही छळ सुरूच असल्याचे रेशमाने कुटुंबीयांना सांगितले होते. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री रेशमाने माहेर गाठून पुन्हा त्रास होत असल्याचे सांगितले. रात्री उशीर झाल्याने सकाळी पाहू, असे सांगून तिला परत पाठवण्यात आले.

२५ ऑक्टोबर २०२४ रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास आरोपीने मित्र तौसीफ शेख याला फोन करून पत्नीला मारल्याची माहिती दिली. त्यानंतर तौसीफने पीडितेच्या वडिलांना फोन करून दोघांमध्ये भांडण सुरू असल्याचे सांगितले. माहेरचे लोक तातडीने तिच्या घरी गेले असता घराला कुलूप लावलेले होते. कुलूप तोडून आत प्रवेश करताच रेशमा जमिनीवर निपचित पडलेली दिसून आली.

तिच्या गळ्यावर काळसर जखमा असून, डोळे व ओठ सुजलेले होते. तिला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृत रेशमाचे वडील ईद्रीस मुक्तार शेख (४१, रा. इंदिरानगर, कन्नड) यांच्या फिर्यादीवरून कन्नड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तपास अधिकारी तत्कालीन निरीक्षक बी. एस. भापकर यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागुल यांनी १० साक्षीदारांचे जबाब नोंदवले. आरोपीने मित्राला केलेला फोन, मित्राची साक्ष आणि फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. सुनावणीअंती न्यायालयाने भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१) अन्वये आरोपीला दोषी ठरवले. प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक संजय धुमाळ, हवालदार व्ही. व्ही. घादगी आणि अंमलदार व्ही. जी. कबाडे यांनी काम पाहिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT