Man arrested for stalking and threatening girl out of one-sided love
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कॉलेजमध्ये ओळख झालेल्या एकाने मुलीशी मैत्री केल्यानंतर तिला एकतर्फी प्रेमातून अतोनात त्रास दिला. यामुळे मुलीने बारावीत शिक्षण सोडून घरीच बसण्याची वेळ आली. कुटुंबाने शहर सोडून हिरापूर शिवारात राहायला गेले तरी तो पाठलाग करत तुझे लग्न होऊ देणार नाही, तुझ्या होणाऱ्या पतीला आणि तुला दोघांना जिवे मारतो, अशा धमक्या देऊ लागला. अखेर पीडितेने चिकलठाणा पोलिसांत तक्रार देताच आरोपीला अटक करण्यात आली.
हेमंत संजय काकड (२२, रा. सातारा परिसर) असे अटकेतील तर प्रकाश रतन जोगदंड असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी २१ वर्षीय मुलीचे वडील शहरात व्यवसाय करून उदर्निवाह करतात. ते तीन महिन्यांपूर्वी चिकलठाणा भागात वास्तव्यास होते. मुलगी ही इयत्ता बारावीत शिकत असताना तिच्याच कॉलेजमध्ये आर ोपी हेमंत काकडही होता. मुलगी एका नामांकित कोचिंग क्लासेसमध्ये नीट किंवा जेईईची यापैकी एका परीक्षेची तयारी करत होती.
तिला शिकून डॉक्टर, इंजिनिअर होण्याची मोठी इच्छा होती. अभ्यासातही ती हुशार आहे. मात्र तिच्याच कॉलेजमध्ये शिकणारा हेमंत तिला पाठलाग करून त्रास देऊ लागला. एकतर्फी प्रेमात तो तिच्या घरापर्यंत पाठलाग करू लागला. यामुळे तिचे कुटुंब प्रचंड दहशतीत गेले. काकड हा स्वतः पाठलाग करायचा त्यावर त्याच्या दुसऱ्या साथीदारांना तिच्या भावाचाही पाठलाग करायला सांगायचा. दरम्यान, मुलीच्या वडिलांनी शहरातून बाहेर राहण्यास जाण्याचा निर्णय घेतला.
हिरापूर शिवारात कुटुंब राहण्यास गेले. त्यामुळे मुलीवर शिक्षण सोडण्याची वेळ आली. कॉलेज, क्लासेसला जाणे बंद करून मुलगी घरी राहू लागली. मात्र तरीही काकड तिचा पाठलाग सोडण्यास तयार नव्हता. त्याने तिच्या घरापर्यंत मग काढत तिला तुझे लग्न होऊ देणार नाही, झाल्यावर तुझ्यासह होणाऱ्या पतीला जिवे मारून टाकतो, अशी धमकी दिली.
फोटो व्हायरल करण्याची धमकी
काकडने पीडितेचा वारंवार पाठलाग करून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. तिच्या अंगाला स्पर्श करून विनयभंग केला. तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितने चिकलठाणा पोलिसात धाव घेतली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी काकडला रविवारी (दि.३०) अटक केली. बुलेट आणि मोबाईल जप्त केला. न्यायालयाने त्याची हसूल कारागृहात रवानगी केली. काकडवर सातारा पोलिस ठाण्यात यापूर्वी मारहाणीचा गुन्हा नोंद आहे. अधिक तपास उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे करत आहेत.