आरोपींना अटक करणारे गुन्हे शाखेचे पथक. खाली बसलेले तीन आरोपी. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime : नशेचा बाजार मांडणाऱ्या मालकची टोळी गजाआड

तस्करीत पुन्हा गुजरात कनेक्शन; १९० सिरपच्या बाटल्या जप्त

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : तुरुंगातून जामिनावर बाहेर येताच पुन्हा एकदा नशेच्या सिरपचा गोरखधंदा सुरू करणाऱ्या कुख्यात सय्यद अखिल ऊर्फ मालक याच्या गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. बीड बायपास परिसरातील अबरार कॉलनीत सोमवारी (दि.६) रात्री छापा टाकून पोलिसांनी १९० बाटल्यांचा साठा जप्त केला. या कारवाईत अखिल मालकसह त्याच्या दोन नव्या साथीदारांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

मुख्य सूत्रधार सय्यद अखिल ऊर्फ मालक सय्यद काजी हुसैनी (३५), शेख आवेज शेख नवाब (२३, दोघे रा. सिल्कमिल कॉलनी) आणि शेख अरबाज शेख फिरोज (२६, रा. अबरार कॉलनी) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी दिली.

पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहर नशामुक्त करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. गुन्हे शाखेसह एनडीपीएस पथकाला कामाला लावून ड्रग्ज तस्करांच्या टोळ्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. गुन्हे शाखेला अबरार कॉलनीत नशेच्या सिरपचा साठा असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, सोमवारी पथकाने अरबाजच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी घरात लपवून ठेवलेल्या तब्बल ७६ हजार रुपये किमतीच्या १९० बाटल्या आढळून आल्या. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा अवैध माल नेमका कोणत्या कंपनीचा आहे आणि तो कोठून आणला गेला, याचा पोलिसांना थांगपत्ता लागू नये यासाठी आरोपींनी अत्यंत चलाखी केली होती. सिरपच्या सर्व बाटल्या त्यांनी आधी पाण्यात भिजवून ठेवल्या व त्यावरील लेबल्स पूर्णपणे काढून टाकले. मात्र पोलिसांच्या सखोल तपासापुढे त्यांची ही शक्कल कुचकामी ठरली. पोलिसी खाक्या दाखवताच नशेच्या सिरपची ही मोठी खेप थेट गुजरातमधून मागवण्यात आल्याचे आरोपींनी कबूल केले.

ही कारवाई उपायुक्त रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप काळे, अर्जुन कदम, अंमलदार योगेश गुप्ता, श्रीकांत काळे, संदीप तायडे, मनोहर गिते, मनोज विखणकर, अक्षय नाटकर, जुनैद शेख, सागर साळवे, पूजा इंगळे, गिता शिकारे, दत्तात्रय गरड आणि सोमनाथ दुकले यांच्या पथकाने केली. अखिलचा पार्टनर सय्यद फेरोज ऊर्फ अंधा फिरोज याला एनडीपीएसच्या पथकाने सिरप विकताना अटक केली होती. जामिनावर सुटून बाहेर आल्यावर त्याने पुन्हा दोन नवीन साथीदार जोडले आणि नशेचा बाजार नव्याने मांडला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT