महापालिकेत प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल File Photo
छत्रपती संभाजीनगर

महापालिकेत प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल

महापौर-उपमहापौर येण्यापूर्वीच आयुक्तांची हालचाल : पाणीपुरवठा, अतिक्रमण, रस्ते विभागात नव्या जबाबदाऱ्या

पुढारी वृत्तसेवा

Major administrative changes at the municipal corporation level

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा महापालिकेत १० फेब्रुवारी रोजी महापौर व उपमहापौर पदभार स्वीकारणार असून, त्याआधीच आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रशासकीय पातळीवर महत्त्वाचे फेरबदल केले आहेत. शहराच्या कारभाराला गती देण्यासाठी आणि विभागीय समन्वय मजबूत करण्याच्या उद्देशाने ही पुनर्रचना करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

यात शहरातील संपूर्ण पाणीपुरवठ्याची जबाबदारी कार्यकारी अभियंता वसंत भोये यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. अतिक्रमण हटाव विभागाचे सनियंत्रण अधिकारी संतोष वाहुळे यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात आले असून, उपायुक्त सविता सोनवणे या आता संपूर्ण अतिक्रमण हटाव विभागाचे नेतृत्व करणार आहेत. दक्षता कक्ष प्रमुखपदी पुन्हा एकदा एम. बी. काझी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. झोन क्रमांक १ मधील उपअभियंता संजय चामले यांची नगररचना विभागात बदली करून गुंठेवारी कक्षाची जबाबदारी देण्यात आली आहे.

मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी १० जून २०२५ रोजी मोठ्या प्रमाणात फेरबदल केले होते. त्यानंतरच्या सात महिन्यांत काही अधिकारी निवृत्त झाले. त्यामुळे प्रभारी नियुक्त्यांवर कामकाज सुरू होते. मात्र महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्यांचे धोरण काही काळ स्थगित ठेवण्यात आले होते; निवडणूक संपताच पुन्हा फेरबदलांचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, शहर अभियंता म्हणून संजय कोंबडे यांची यापूर्वीच नेमणूक झाली आहे. तसेच मनपातील अत्यंत महत्वाचा कामगार विभाग उपायुक्त राहुल सूर्यवंशी यांच्याकडे देण्यात आला असून, त्यांनी यापूर्वीही हा विभाग प्रभावीपणे सांभाळला होता. घनकचरा विभागाची जबाबदारी नंदकिशोर भोंबे यांच्याकडेच ठेवण्यात आली असून, सहायक आयुक्त श्रीधर टारपे त्यांना सहकार्य करणार आहेत.

सहायक आयुक्त ऋतुजा पाटील यांच्याकडे पर्यटन, कामगार व पर्यावरण विभाग सोपविण्यात आले आहेत. झोन पातळीवरही बदल करण्यात आले असून, झोन क्रमांक १ मध्ये सविता सोनवणे यांच्या रिक्त जागी अर्चना राजपूत यांची वॉर्ड छापती संभाजीनगर माहानगरपालिका छत्रपती संभाजीनगर अधिकारी म्हणून नेमणूक झाली आहे.

तर झोन ४ मध्ये उदय मानवतकर, झोन ७ मध्ये विलास भणगे व झोन १० मध्ये लता पुजारी यांना जबाबदारी देण्यात आली आहे. सहायक आयुक्त उदय मोकाशी यांची कर नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली. महापौर-उपमहापौर पदग्रहणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या फेरबदलांमुळे मनपा प्रशासनाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

रस्ते विभाग कार्यकारी अभियंता शिरसाट यांच्याकडे रस्ते विभागाची जबाबदारी कार्यकारी अभियंता संजय कोंबडे यांच्याकडे होती. आता हा विभाग कार्यकारी अभियंता बाळासाहेब शिरसाट पाहणार असून, उपअभियंता म्हणून संजय कुलकर्णी, आरती नवगिरे व लक्ष्मीकांत कोतकर यांना जबाबदारी देण्यात आली आहे. तर यांत्रिकी विभागाची जबाबदारी सचिन वाईकर यांच्याकडे देण्यात आली असून, कार्यकारी अभियंता विजय गोरे यांच्याकडे घनकचरा स्थापत्य, बीओटी व इमारत विभाग सोपविण्यात आला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT