आन्वा ः राज्यातील ग्रामीण आरोग्यसेवा अधिक सक्षम, रोगमुक्त व स्वयंपूर्ण करण्याच्या दिशेने आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या महत्त्वाकांक्षी माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव या अभियानास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
त्यानुसार 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 पर्यंत हे अभियान राज्यभर राबवले जाणार आहे. गावपातळीवर नागरिकांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी, प्रतिबंधात्मक व प्रोत्साहनात्मक आरोग्यसेवांना देण्यासाठी, आरोग्यविषयक चालना सामाजिक वर्तणुकीत बदल आणि आरोग्यदायी जीवनशैली रुजवण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरणार आहे.
सार्वजनिक स्वच्छता, पाणीपुरवठा, सामाजिक प्रबोधन यासह ग्रामीण भागातील विविध घटकांच्या समन्वयाने आरोग्यदायी गाव बनवणे हा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यात हे अभियान राबविण्यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गावागावांत यासंबंधाने जनजागृती करण्याची मोहीम प्रशासनाने उघडली आहे.
राज्यस्तरीय पुरस्कार 5 कोटी ते 2 कोटी रुपयांपर्यंत असतील. अभियानासाठी 80.75 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. भोकरदन तालुक्यातील ग्रामीण भागाला या योजनेचा विशेष लाभ होईल, ज्यात जिल्हा परिषद, तालुका व ग्रामपंचायतींचा सक्रिय सहभाग असेल. ही योजना समाजाच्या सर्व घटकांच्या सहभागाने लोकचळवळ ठरेल आणि ग्रामीण आरोग्याला नवी दिशा मिळेल.
या अभियानात उपचारांपेक्षा आजार होऊ नयेत, यावर भर देण्यात येणार असून, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे, माता-बाल आरोग्य सुधारणे, पोषण, स्वच्छता, सुरक्षित पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, जीवनशैलीजन्य आजार नियंत्रण आणि मानसिक आरोग्य यांचा समावेश आहे. नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा सरकारचा मानस आहे.
गावांना मिळणार कोट्यवधींचे पुरस्कार
अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती आरोग्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होईल. अपर मुख्य सचिव व आयुक्त सदस्य असतील. राज्य कृती समितीचे अध्यक्ष सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव असतील. गावांचे मूल्यमापन होईल आणि 70 टक्यांपेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या गावांना आरोग्यसंपन्न गाव घोषित करून स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पुरस्कार दिले जाणार आहेत.