Chhatrapati Sambhajinagar Kirtankar Murdered Latest News
वैजापूर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात आश्रमात घुसून महिला कीर्तनकार ह.भ.प. संगीताताई महाराज यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी अखेर दोन आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून, या हत्येमागील गूढ उकलण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.
चार दिवसांपूर्वी वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील आश्रमात ह.भ.प. संगीताताई महाराज यांची अज्ञातांनी दगडाने ठेचून हत्या केली होती. या क्रूर घटनेमुळे वारकरी संप्रदायासह संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. एका आरोपीला वैजापूर तालुक्यातून ताब्यात घेण्यात आले, तर दुसऱ्या मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाने थेट मध्य प्रदेशात धाड टाकली. विश्वसनीय पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
या अटकेपूर्वी, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची मागणी केली होती. या मागणीनंतर तपासाला आणखी वेग आला आणि पोलिसांनी आरोपींना यशस्वीरीत्या जेरबंद केले. या कारवाईमुळे, राज्यात खळबळ माजवणाऱ्या या निर्घृण हत्येकांडामागील कारण लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.