

वैजापूर : ऐन आषाढी वारीच्या काळात महिला कीर्तनकाराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाली आहे. आश्रमात एकट्याच राहणाऱ्या एका महिला कीर्तनकाराची झोपेत असताना डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २७) मध्यरात्री घडली होती. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथील रहिवासी असलेल्या ५० वर्षीय किर्तनकार संगिताताई पवार यांनी ब्रह्मचर्य व्रत स्वीकारले होते.सराला बेटाचे मंहत नारायणगिरी महाराज व रामगिरी महाराज यांना त्यांनी गुरुस्थानी मानले होते. गुजरातमधील वृदांवन येथे पाच वर्ष राहून त्यांनी अध्यात्मिक शिक्षण आत्मसात करुन परिसरात त्या कार्तनकार म्हणून ओळखल्या जात होत्या. विविध धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. वैजापूर येथील आश्रमात त्या एकट्याच असताना झोपेत त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. मृत किर्तनकार संगीताताई पवार यांच्या वडिल अण्णासाहेब पवार यांनी ही हत्या जमिनीच्या वादातून झाल्याचा संशय पुढारीशी बोलतांना व्यक्त केला. संगीताताई ह्या त्यांच्या थोरली कन्या असून दुसरी मुलगी पोलीस दलात आहे तर मुलगा शेती करतो.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात असेही उघड झाले आहे की, हत्येच्या काही दिवस आधी, म्हणजेच १४ एप्रिल रोजी संगीताताईंचा संशयितांसोबत जोरदार वाद झाला होता. याच वादाचे पर्यवसान हत्येत झाल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवत चार संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून हत्येमागील संपूर्ण गुढ उलगडण्याची शक्यता आहे.