Mahayuti's 'Shetkari Vikas Panel' Dominates District Bank
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनल (महायुती) ने दणदणीत विजय मिळवून विरोधकांचा धुव्वा उडवला. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह पॅनलचे सात उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत. रविवारी (दि.५) राज्याचे मंत्री अतुल सावे, आ. रंजना जाधव, अनुराधा चव्हाण यांच्यासह १० उमेदवार विजयी झाले. आ. अंबादास दानवे हे महायुतीच्याच पॅनलकडून निवडून आले, तर भूमिपुत्र शेतकरी बँक बचाव पॅनलचे एकमेव खा. डॉ. कल्याण काळे हे विजयश्री खेचून आणण्यात यशस्वी ठरले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या १२ जागांसाठी शनिवारी मतदान झाले. एकूण १ हजार ५३ मतदारांपैकी एक हजार ४८ जणांनी (९९.५३ टक्के) आपल्या मतदानाचा हक्क बजावला. या मतदानाची मोजणी रविवारी सकाळी आठ वाजेपासून जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक समृत जाधव यांच्या देखरेखीखाली झाली. प्रक्रियेदरम्यान, मंत्री सावे, खा. डॉ. कल्याण काळे आदी सकाळपासूनच ठाण मांडून होते.
सर्वात पहिले मविआच्या भूमिपुत्र शेतकरी बैंक बचाव पॅनलचे खा. कल्याण काळे हे ४८ मते घेत विजयी ठरले. त्यांच्या पॅनलच्या इतर आठही उमेदवारांचा पराभव झाला. बिगर शेती संस्था मतदारसंघाच्या पाच जागांवर ओबीसी मंत्री अतुल सावे (२६७ मते), रामराव शेळके (२३७ मते), अर्जुन पाटील (२२३ मते) आ. अंबादास दानवे (२१० मते), तर स्वींद्र काळे यांना (१८९ मते) मिळाली. निकाल जाहीर होताच शेतकरी विकास पॅनलच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मंत्री सावे, खा. संदीपान भुमरे, आ. सतीश चव्हाण, अनुराधा चव्हाण यांच्यासह समर्थकांनी एकमेकांना मिठाईचे वाटप केले.
महिला सदस्य संस्था मतदारसंघाच्या दोन जागांसाठी तिरंगी लढतीत आ. चव्हाण आणि मुक्ता तांगडे हे अनुक्रमे (७४९) आणि (६४०) मतांसह विजयी ठरले. पराभूत उमेदवार नीलिमा डोणगावकर यांना (५१३) मते पडली. तसेच इतर मागासवर्गीय सदस्य मतदारसंघात सुवर्णा जाधव यांनी (५४०) मते प्राप्त करत प्रतिस्पर्धी अॅड. देवयानी डोणगावकर यांचा पराभव केला. डोणगावकर यांना (४६७ मते) मिळाली.
सोयगाव मतदारसंघातून प्रभाकर काळे यांनी (३७मते) घेत विजय नोंदविला. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला खातेही उघडता आले नाही. कन्नडमधून आ. रंजना जाधव यांनी (९८ मते) घेत विजय नोंदविला. त्यांच्या विरोधी पाच उमेदवारांना खाते उघडता आले नाही. तर गंगापूर येथून (४९ मते) मिळवत शेषराव जाधव हे विजय झाले. प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार राजू पोळ यांना (४३), तर संजय जाधव यांना (३ मते) मिळाली. तर (७ मते) अवैध ठरली.
शेतकरी विकास पॅनलच्या खाली महायुतीने १९ जागा जिंकल्या आहेत. बँकेच्या सभासदांनी आमच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे शेतकऱ्यांचे हित व बँकेच्या विकासासाठी एकत्र काम करू, हे निश्चित. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ठरवतील तोच बँकेचा अध्यक्ष होईल.- अतुल सावे, विजयी उमेदवार तथा, राज्याचे मंत्री.
कधी नव्हे ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. त्यामुळे आमच्या पॅनलचा पराभव झाला. तरी मतदारांनी दिलेला कौल मान्य आहे. बँक आणि शेतकरी हिताच्या निर्णयांना पाठिंबा आणि विरोधातील निर्णयांना कडाडून विरोध राहील.- खा. कल्याण काळे, विजयी उमेदवार, भूमिपुत्र शेतकरी सहकार बैंक बचाव पॅनल.
हे ८ जण आधीच बिनविरोध
अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्री संजय शिरसाट, आ. विलास भुमरे, रमेश बोरणारे, संदीप निकम, अनिल बोरसे, समीर सत्तार, दिनेश परदेशी, अर्जुन गाढे यांचा एकमेव अर्ज राहिल्याने या सर्व आठही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आहे.
शिंदे सेना ठरला मोठा भाऊ
महापालिका, जिल्हा परिषद हातून गेल्यानंतर बँकेच्या निवडणुकीत शिंदे सेना सर्वाधिक जागा जिंकून मोठा भाऊ ठरला आहे. २० पैकी सर्वाधिक ९ संचालक शिंदे सेनेचे निवडून आले आहेत. भाजप सहा संचालकांसह दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन संचालक निवडून आले आहेत, तर १ शिवसेना उबाठा आणि काँग्रेस तसेच एक अपक्ष निवडून आला आहे. त्यामुळे आता बँकेच्या अध्यक्षपदासाठी दावाही शिंदे सेनेचाच असणार आहे.