Mahavitaran News : कडा भवनची जागा वीज उपकेंद्रांसाठी उपलब्ध file photo
छत्रपती संभाजीनगर

Mahavitaran News : कडा भवनची जागा वीज उपकेंद्रांसाठी उपलब्ध

तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश : पुढील २५ वर्षांच्या वीज वितरणाचे नियोजन शक्य

पुढारी वृत्तसेवा

Mahavitaran News: Kada Bhavan site available for electricity substations

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कडा भवन परिसरात १३२/३३ के. व्ही. उपकेंद्र तसेच ३३/११ के.व्ही. उपकेंद्रासाठी जागा मिळावी यासाठी तब्बल तीन वर्षे महापारेषणसह महावितरणने पाठपुरावा केला. याला यश मिळाले असून, कडा परिसरातील सुमारे ९ हजार ७५० चौरस मीटर जागा शासनाने उपलब्ध करून दिल्याचे आदेश ३० जुलै रोजी काढण्यात आले. महावितरणच्या प्रयत्नावर दैनिक पुढारीने सतत प्रकाश टाकून शहरातील नागरिकांच्या अडचणी मांडल्या होत्या. या उपकेंद्रामुळे शहरातील ग्राहकांचा विजेच्या लपंडावातून सुटका होणार आहे. या उपकेंद्रामुळे पुढील २५ वर्षांचे वीज विरतणाचे नियोजन करण्यास महावितरणला मदत होणार आहे.

राज्य शासनाने जलसंपदा विभागाच्या ताब्यातील ९ हजार ७५० चौरस मीटर जागा महापारेषण व महावितरणच्या वीज उपकेंद्रांसाठी उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली आहे. ही जागा महसूल व वन विभागाकडे विनामूल्य प्रत्यार्पित करण्यात आली असून, पुढील जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येथे उपकेंद्र उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. कडा भवन परिसरात १३२/३३ के. व्ही. उपकेंद्र तसेच ३३/११ के.व्ही. उपकेंद्र उभारण्यात येणार आहे. महापारेषणसाठी आणि महावितरणसाठी आवश्यक असलेल्या या उपकेंद्रांमुळे शहरातील वीज वितरण जाळे अधिक सक्षम होणार आहे. वाढत्या वीजभाराचे योग्य नियोजन करणे, नवीन वीज जोडण्या देणे आणि वीज पुरवठ्यातील तांत्रिक अडचणी कमी करणे शक्य होणार आहे.

शहराच्या भविष्यातील वीज गरजांसाठी पॉवर हब

कडा भवन येथील जागेवर उभारण्यात येणारी उपकेंद्रे ही केवळ सध्याचा वीजभार कमी करण्यापुरती मर्यादित राहणार नाहीत. शहराची वाढती लोकसंख्या, नवीन गृहप्रकल्प, व्यावसायिक आस्थापना आणि भविष्यातील औद्योगिक विकास लक्षात घेऊन पुढील २५ वर्षांच्या वीज गरजाचे नियोजन या प्रकल्पातून करता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प छत्रपती संभाजीनगरच्या भविष्यातील वीज वितरण व्यवस्थेसाठी महत्त्वाचा पॉवर हब ठरण्याची अपेक्षा आहे.

विजेच्या लपंडावातून होणार सुटका :

शहरात दरवर्षी सुमारे १० हजार नवीन ग्राहक महावितरणशी जोडले जात आहेत. त्यामुळे विद्यमान उपकेंद्रे, वीजवाहिन्या आणि वितरण यंत्रणेवर अतिरिक्त भार पडत आहे. काही भागांत भार वाढल्याने वीज पुरवठा वारंवार खंडित होणे, कमी-जास्त दाबाने वीज मिळणे आणि देखभाल-दुरुस्तीच्या वेळी पर्यायी व्यवस्था उभारण्यात अडचणी येत होत्या. नव्या उपकेंद्रामुळे वीजभाराचे विभाजन करून वितरण अधिक सुकर होणार आहे. या उपकेंद्रामुळे पुढील २५ वर्षांच्या वीज वितरणाचे दीर्घकालीन नियोजन करणे शक्य होणार आहे. भविष्यात वाढणाऱ्या निवासी वसाहती, उद्योग, व्यापारी संकुले आणि इतर विकास प्रकल्पांसाठी आवश्यक वीज पायाभूत सुविधा उभारण्यासही या प्रकल्पाची मदत होणार आहे.

महावितरणच्या सलग तीन वर्षांच्या पाठपुराव्याला यश

कडा भवन येथील ९ हजार ७५० चौरस मीटर जागा उपलब्ध

१३२/३३ के.व्ही. आणि ३३/११ के. व्ही. उपकेंद्र उभारणार

शहरात दरवर्षी सुमारे १० हजार नवीन वीज ग्राहकांची भर

वाढत्या भारामुळे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याला दिलासा मिळण्याची अपेक्षा

वीजभाराचे विभाजन करून वितरण व्यवस्था अधिक सक्षम होणार

पुढील २५ वर्षाच्या वीज गरजाचे नियोजन करणे शक्य

शहराच्या विस्तारासाठी महत्त्वाची वीज पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT