Mahavitaran News File Photo
छत्रपती संभाजीनगर

Mahavitaran News : महावितरणची जिल्हाभरात अघोषित 'लोडशेडिंग'

दिवसभरातून दोन ते तीन तास वीज गुल

पुढारी वृत्तसेवा

Mahavitaran Implements Unannounced 'Load Shedding' Across the District

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरासह जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा वेगाने वाढत असून, अंगाची लाहीलाही होत आहे. या भीषण उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक पंखे, कूलरचा आधार घेत असतानाच महावितरणने कोणतीही पूर्वसूचना न देता अघोषित लोडशेडिंग सुरू केल्याने नागरिकांचे दुहेरी हाल होत आहेत.

शहरासह ग्रामीण भागातही दिवसभरातून दोन ते तीन वेळा विजेचा लपंडाव सुरू आहे. तक्रार करण्यासाठी फोन केल्यास अधिकाऱ्यांचे फोन जाणीवपूर्वक एंगेज ठेवले जात असल्याचा आरोप होत असून, महावितरणच्या या भोंगळ कारभारामुळे ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. दुपारी घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. अशातच महावितरणकडून शहरासह ग्रामीण भागातही अघोषित भारनियमन सुरू करण्यात आले आहे. अनेक भागांत दररोज दोन-दोन तास वीज गायब असते. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, महे लोडशेडिंग नसून तांत्रिक बिघाडामुळे वीज पुरवठा खंडित झाला आहे, फ अशी नेहमीचीच जुजबी आणि छापील उत्तरे देऊन कर्मचारी वेळ मारून नेत आहेत.

पूर्वसूचनेचा विसर; संपर्काचे सर्व मार्ग बंद

नियम आणि आदेशानुसार वीज पुरवठा खंडित झाल्यास तो कधी सुरळीत होईल, याची आगाऊ माहिती ग्राहकांना एसएमएसद्वारे देणे महावितरणला बंधनकारक आहे. मात्र महावितरणला या नियमाचा पूर्णपणे विसर पडला आहे. सध्या ग्राहकांना असे कोणतेही मेसेज प्राप्त होत नाहीत. वीज गेल्यावर माहिती घेण्यासाठी स्थानिक कार्यालय किंवा कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांचे नंबर सतत एंगेज (व्यस्त) दाखवतात. स्थानिक लाईनमनला फोन लागलाच, तर त्यांच्याकडून अरेरावीची व उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात दाद कोणाकडे मागायची, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची सोयीस्कर चुप्पी

वीज पुरवठा सातत्याने का खंडित होत आहे? उन्हाळ्याचे नियोजन का फसले? याबाबत महावितरणच्या मुख्य अभियंत्यांपासून ते अधीक्षक अभियंत्यांपर्यंत सर्वांशी संपर्क साधून कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोनला कोणताही प्रतिसाद न देता सोयीस्कर मौन बाळगणे पसंत केले.

नियोजनाचा पूर्णपणे उडाला बोजवारा

उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते, याची पूर्वकल्पना आणि सर्व ग्राहकांचा डेटा महावितरणकडे उपलब्ध असतो. तरीही उन्हाळ्यापूर्वी पायाभूत सुविधांचे योग्य नियोजन करण्यात महावितरण अपयशी ठरले आहे. वेळीच ट्रान्सफॉर्मरची देखभाल आणि वाढीव विजेचे नियोजन केले असते, तर आज नागरिकांना या उकाड्यात घामाघूम व्हावे लागले नसते.

लहान मुले व ज्येष्ठांचे हाल

दुपारी ऐन उन्हावेळी वीज गायब होत असल्याने घरांमध्ये उकाडा असह्य होत आहे. या वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका लहान मुले आणि वृद्ध नागरिकांना बसत आहे. आजारी व्यक्ती आणि ज्येष्ठांची काळजी घेताना कुटुंबीयांच्या नाकीनऊ येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT