Mahavitaran: Electricity supply to defaulters will be disconnected
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वीज बिलांच्या वसुलीसाठी थकबाकीदारांचा पुरवठा खंडित करण्याची धडक मोहीम महावितरणने सुरू केली आहे. छत्रपती संभाजीनगर परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील ५ लाखांहून अधिक ग्राहकांकडे सुमारे ३०० कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी भरून सहकार्य करावे अन्यथा गुन्हे दाखल करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर परिमंडलात घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर वर्गवारीतील ५ लाख ९ हजार ७३२ ग्राहकांकडे २९६ कोटी ८८ लाखांची थकबाकी आहे. यात घरगुती-४ लाख ५९ हजार ४४४ ग्राहकांकडे २३९ कोटी ११ लाख, व्यावसायिक ३७ हजार २९० ग्राहकांकडे ३२ कोटी ८० लाख, औद्योगिक-७ हजार ४९ ग्राहकांकडे १३ कोटी २४ लाख व इतर वर्गवारीतील ५ हजार ६४९ ग्राहकांकडे ११ कोटी ७३ लाख रुपयांची थकबाकी आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात १ लाख ३४ हजार ७४१ ग्राहकांकडे ६९ कोटी ६ लाख, ग्रामीणमधील २ लाख ३२ हजार ४९६ ग्राहकांकडे ८४ कोटी ७९ लाख व जालना मंडलातील १ लाख ४२ हजार ४९५ ग्राहकांकडे १४३ कोटी ३ लाख रुपयांची थकबाकी आहे.
धडक वसुली मोहीम
महावितरणने वसुली मोहीम हाती घेतली असून, मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. तर अनधिकृतरीत्या वीज वापर करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.