छत्रपती संभाजीनगर : शहरातील वीजगळती अधिक असलेल्या वाहिन्यांवर महावितरणने तपासणी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत मागील दोन दिवसांत ६९ ग्राहक वीजचोरी आले. तर वीजचोरीचा संशय असलेले १२३ मीटर तपासणीसाठी जप्त करण्यात आले आहेत. महावितरणच्या या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.
विशेष मोहिमेत शहर-१ विभागातील टाऊन हॉल, गरमपाणी, नारळीबाग, मिल कॉर्नर, भोईवाडा, काजीवाडा, शहागंज, नवाबपुरा, जसवंतपुरा, चेलीपुरा, सिटी चौक, असेफिया कॉलनी, कोहिनूर कॉलनी, बेगमपुरा, जयसिंगपुरा, किराडपुरा, जकात नाका, टाइम्स कॉलनी, चंपा चौक, आझाद चौक, अल्तमश कॉलनी, कटकट गेट, हर्मूल, जटवाडा, छावणी, नंदनवन कॉलनी, भावसिंगपुरा, निसर्ग कॉलनी, लालमाती, पडेगाव परिसरातील कोमलनगर, कासंबरी दर्गा आदी वसाहतींत ही मोहीम राबवण्यात आली.
मोहिमेत ६९ ग्राहक वीजचोरी करताना आढळून आले. त्यांना निर्धारित बिले देण्यात येणार आहेत. वीजचोरीचा संशय असलेले १२३ मीटर जप्त करण्यात आले असून, त्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यात फेरफार आढळल्यास ग्राहकाने जोडलेल्या वीजभारानुसार वीजचोरीचे निर्धारित बिल तसेच दंड आकारला जाणार आहे. ग्राहकाने बिल व दंड न भरल्यास त्याच्यावर गुन्हा नोंदविला जाणार आहे.
वीजचोरी कळवण्याचे आवाहन
वीजचोरीची माहिती देणाऱ्यांना वीजचोरीच्या निर्धारित रकमेच्या दहा टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्यात येते. वीजचोरी करणाऱ्या ग्राहकाने वीजचोरीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतरच बक्षीस देण्यात येते. वीजचोरीची माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येते, अशीही माहिती महावितरणने दिली.