Mahavitaran: Benefits of automatic permission scheme to customers
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक अशा सर्व वीज ग्राहकांना गरजेनुसार वीजवापर वाढविण्यासाठी महावितरणने स्वयंचलित परवानगी योजना राबविल्यामुळे ४ हजार १६४ वीज ग्राहकांनी सुमारे एक महिन्यात २२ मेगावॅट क्षमता वाढवून घेतली. यामध्ये २४६० औद्योगिक वीज ग्राहकांचा समावेश असून दिवाळीपूर्वी मागणीनुसार उत्पादन वाढविण्यास त्यांना मदत झाली.
महावितरणने इज ऑफ लिव्हिंगच्या सूत्रानुसार ग्राहकांसाठी मंजूर भार वाढविण्यासाठी (लोड एनहान्समेंट) एक स्वयंचलित व्यवस्था सुरू केली आहे. या योजनेत ग्राहक महावितरणच्या मोबाईल अॅप्लिकेशन किंवा वेबसाईटवर अर्ज सादर करून शुल्काचा भरणा करत मंजूर भार वाढवून घेऊ शकतात. ग्राहकाने शुल्क भरल्यानंतर ४८ तासांत त्याला परवानगी असलेला मंजूर भार वाढवून दिला जातो.
लाभ २ हजार ४६० ग्राहकांनी घेतला महावितरणने ही सुविधा २६ सप्टेंबर रोजी सुरू केली. महिनाभरात राज्यातील ४ हजार १६४ ग्राहकांनी नव्या सुविधेचा लाभ घेतला. त्यामध्ये सर्वाधिक २ हजार ४६० औद्योगिक वीज ग्राहक आहेत. घरगुती ग्राहकांची संख्या ९४२ असून ५०९ व्यावसायिक ग्राहकांनी सुविधेचा लाभघेतला. याखेरीज २५३ अन्य ग्राहकांनाही लाभ घेतला.
अधिक भाराला तात्काळ मंजुरी
ग्राहकांच्या मागणीनुसार वीज वापराबाबतची क्षमता निश्चित केली जाते, त्याला मंजूर भार म्हणतात. औद्योगिक ग्राहकांना उत्पादनात वाढ होत असेल किंवा अधिक क्षमतेची यंत्र सामग्री वापरायची असेल तर अधिक भार मंजूर करून घ्यावा लागतो. सामान्यतः घरगुती वीज ग्राहकांचा मंजूर भार दोन ते पाच किलोवॅट इतका असतो. ग्राहकांना एअर कंडिशनिंगसारख्या सुविधा बसविण्यासाठी भार वाढवून घ्यावा लागतो. महावितरणने सुरू केलेल्या नव्या सुविधेमुळे ग्राहकांना ऑनलाईन सेवा उपलब्ध झाली आहे.