Maharashtra has received ample funding for railways
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नुकतेच केंद्राचे बजेट सादर झाले. यात महाराष्ट्रात रेल्वेला भरभरून निधी देण्यात आला आहे. हायस्पीड रेल्वे, रेल्वेस्थानकांना अत्याधुनिक सुविधादरम्यान यात मराठवाड्यातील एकाही मार्गाचा उल्लेख नसल्याने मराठवाड्याच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे. महत्त्वाचा असलेल्या संभाजीनगर अहिल्यत्रनगर, चाळीसगाव मार्गही रखडणार आहे.
छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर नवीन रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला मान्यता मिळाली होती. या कामाचा डीपीआर सादर करण्यात आला नसल्याने या मार्गाबाबत बजेटमध्ये एकही शब्द नाही. तशीच अवस्था चाळीसगाव मार्गाची झाली आहे.
मराठवाड्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले अहिल्यानगर आणि चाळीसगाव मार्गाबाबत कुठलाच उल्लेख नसल्याने येणारे पाच वर्षे तरी यावर काहीच होणार नसल्याने मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी आहे तीच राहणार आहे. यात कुठलीही भर पडणार नाही.
चाळीसगाव मार्गही गायब
दरम्यान, संभाजीनगर ते चाळीसगाव हा मार्ग अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. या मार्गामुळे खान्देश मराठवाड्याशी जोडला जाणार होता. हा मार्ग यावेळी निश्चित होईल, असे वाटत असतानाच यावर चकार शब्द निघाला नसल्याने याही आशा मावळल्या आहेत. बजेटमध्ये महाराष्ट्रातील रेल्वेच्या विस्तारासाठी अनेक योजना बनवण्यात आल्या, परंतु यात मराठवाड्याला कुठलेही स्थान देण्यात आले नाही. यामुळे रेल्वेप्रेमींत मोठ्या प्रमाणात निराशा पसरली आहे.