Luring an elderly woman with the promise of a lottery win, they took away her bangles weighing three tolas.
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : तुम्हाला ६० हजार रुपयांची लॉटरी लागली आहे, असे आमिष दाखवून दुचाकीस्वार भामट्याने वृद्धेच्या तब्बल ३ तोळ्यांच्या सोन्याच्या बांगड्या लुबाडून नेल्या. ही घटना मंगळवारी (दि.२६) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बजरंग चौकात घडली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिडकोतील एन-७, बजरंग चौक येथे राहणाऱ्या इंदूबाई दगडूशेठ वाणी (६५) या मंगळवारी (दि. २६) सकाळी साडेसहाच्या सुमारास महाराष्ट्र बँकेजवळील पेरकर निवास येथून पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या भामट्याने त्यांना थांबवले. तुम्हाला ६० हजार रुपयांची लॉटरी लागली आहे, तुमच्याकडे १० रुपये आहेत का? अशी बतावणी त्याने केली. तसेच विश्वासात घेऊन त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून पिशवीत ठेवण्यास सांगितले.
त्यानंतर या भामट्याने इंदूबाई यांना आपल्या दुचाकीवर बसवून जाधववाडी येथील सनी सेंटरज वळील शेख क्लिनिकजवळ नेले. तेथे त्यांना दुचाकीवरून खाली उतरवून, मी तुमच्या बांगड्यांचे वजन करून आणतो, असा बहाणा करत पिशवीतील ३० ग्रॅमच्या दोन सोन्याच्या बांगड्या घेऊन तेथून पोबारा केला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच इंदूबाई वाणी यांनी सिडको ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्या वरून अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार मंगेश पवार करत आहेत.