Lured by a loan offer: Lost ₹15 lakh
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा सात लाख रुपयांचे 'पर्सनल लोन' तात्काळ मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका सायबर भामट्याने वृद्ध व्यावसायिकाला तब्बल १५ लाख २५ हजार ४०० रुपयांचा गंडा घातला. कर्ज लवकर मंजूर करण्याचे आणि कर्जाची लिमिट वाढवून देण्याच्या बहाण्याने या भामट्याने व्यावसायिकाकडून ऑनलाईन गुगल-पे द्वारे तब्बल ३५० वेळा पैसे उकळले. याप्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात सुरज श्यामनारायण विश्वकर्मा या भामट्याविरुद्ध शनिवारी (दि.२५) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मुकुंद मधुकर अत्रे (रा. साईकृपा रेसिडेन्सी, संत एकनाथ रंगमंदिरामागे, उस्मानपुरा) यांच्या तक्रारीनुसार, ते रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर डिझाईन आणि इन्स्टॉलेशनचा व्यवसाय करतात. १७ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांना सुरज विश्वकर्मा या भामट्याने फोन करून ७ लाख रुपयांच्या कर्जाचे आमिष दाखवले.
कर्ज हवे असल्यास सुरुवातीला १,९९९ रुपये 'प्रोसेसिंग फी' लागेल, असे त्याने सांगितले. अत्रे यांनी त्याच्यावर विश्वास ठेवून यूपीआयवरून १,८०० रुपये पाठवले आणि येथूनच त्यांच्या आर्थिक लुटीच्या मालिकेला सुरुवात झाली.
१७ सप्टेंबर २०२४ ते २७ जुलै २०२६ या पावणेदोन वर्षाच्या कालावधीत आरोपीने अत्रे यांना कर्जाचे गाजर दाखवून त्यांच्या इंडसइंड बँक आणि डच बँकेच्या खात्यावरून तब्बल ३५० वेळा पैसे ट्रान्सफर करायला लावले. आरोपीने कधी १ हजार, कधी ५ हजार, तर कधी १० हजार असे टप्प्याटप्प्याने एकूण १५ लाख २५ हजार ४०० रुपये ऑनलाईन उकळले. अधिक तपास पोलिस निरीक्षक संग्राम ताटे करत आहेत.
पैसे उकळण्यासाठी भामट्याने मारल्या थापा
लोनची फाईल तात्काळ मंजूर करायची असेल तर वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी आणखी ३ हजार रुपये पाठवा. कर्जाची रक्कम ७ लाखांवरून आणखी वाढवायची असेल, तर ५ हजार रुपये भरावे लागतील. अत्रे यांनी जेव्हा जेव्हा पैशाची आणि कर्जाची विचारणा केली, तेव्हा तेव्हा "लोन लवकरच मंजूर होत आहे, थोडेच पैसे बाकी आहेत," अशी थाप मारून त्याने वेळोवेळी पैसे लाटले.