Lumpy outbreak in Sultanpur area
सुलतानपूर : खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर व परिसरातील १३ गावांमध्ये लम्पी त्वचारोगाने प्रचंड थैमान घातले असून, गेल्या महिनाभरात तब्बल १५० हून अधिक जनावरे या आज-ाराने बाधित झाली आहेत. आतापर्यंत १५ जनावरांचा मृत्यू झाला असून, सध्या आणखी ३० जनावरे आजारी आहेत. या साथीमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुलतानपूर पशुवैद्यकीय दवाखाना (श्रेणी-१) अंतर्गत सुलतानपूर, भांडेगाव, खांडी पिंपळगाव, जाफरवाडी, गदाना, बोरवाडी, देवळाना खुर्द, देवळाना बुद्रुक, माटरगाव, खतनापूर, कानडगाव, वडोद बुद्रुक आणि येसगाव या गावांचा समावेश आहे. मात्र या दवाखान्यात औषधांचा मोठा तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना खाजगी मेडिकलवरून महागडी औषधे विकत घ्यावी लागत असल्यामुळे मोठी आर्थिक झळ बसत आहे. सदर दवाखान्याचे पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त असून, अतिरिक्त कार्यभार बाजार सावंगी येथील डॉ. डिगोळे यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे दोन दवाखान्यांचा भार असल्याने शेतकऱ्यांना योग्य सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत. सहायक पशुवैद्यकीय अधिकारीही नियमितपणे उपस्थित राहत नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. शिपायाचे पदही रिक्त असल्याने दवाखान्याचे कामकाज ठप्प झाले आहे.
लम्पी आजारावर शेतकऱ्यांनी अत्यंत काळजी घ्यावी, मात्र घाबरण्याचे कारण नाही. जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावेत, सकाळ-संध्याकाळ लिंबाच्या पानाचा धूर करावा. तसेच योग्य उपचार घेतल्यास तीन दिवसांत हा आजार नियंत्रणात येऊ शकतो.- डॉ. प्रदीप मोराळे, तालुका पशुधन विकास अधिकारी.
दवाखान्यातील दोन कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत १०० हून अधिक जनावरांवर उपचार केले आहेत. मात्र पुरेसे मनुष्यबळ, औषधे आणि सुविधा उपलब्ध नसल्याने रोग नियंत्रणाचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. त्यामुळे लम्पीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
सुलतानपूर दवाखान्यात तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी व शिपायाची नियुक्ती करावी. सर्व कर्मचाऱ्यांनी वेळेवर हजर राहावे. औषधसामग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.