Literacy Test: 73-year-old Rama Aaji takes a literacy test
वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : 'शिकण्याची जिद्द आणि मनात उमेद असेल, तर वय हा केवळ एक आकडा ठरतो," हे छत्रपती संभाजीनगर परिसरातील वडगाव कोल्हाटी येथील एका आजीबाईंनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे. येथील ७३ वर्षीय रमा शांताराम दाभाडे यांनी वयाच्या या टप्प्यावर हातात पाटी-पेन्सिल धरत साक्षरतेची परीक्षा दिली आणि उपस्थितांसमोर एक नवा आदर्श उभा केला.
केंद्र शासनाच्या 'उल्हास नव भारत साक्षरता कार्यक्रमां' तर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वडगाव कोल्हाटी येथे पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या केंद्रावर एकूण ३० नवसाक्षरांनी उत्साहात सहभाग नोंदवला. मात्र, या संपूर्ण परीक्षेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते रमा शांताराम दाभाडे यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात स्वतःच्या पायावर उभे राहत अक्षरांची ओळख करून घेण्याची त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी ठरली.
कोणताही संकोच न बाळगता त्यांनी स्वयंप्रेरणेने परीक्षा केंद्रावर हजेरी लावली आणि अत्यंत आत्मविश्वासाने पेपर सोडवला. परीक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले साक्षरतेचे समाधान आणि हसू उपस्थित शिक्षक व परीक्षार्थीसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरले.
या उपक्रमाबाबत मुख्याध्यापक तथा केंद्र संचालिका प्रणिता आडेकर म्हणाल्या, "रमा आर्जीचा हा उत्साह संपूर्ण समाजासाठी डोळे उघडवणारा आहे. शिक्षणासाठी कधीही उशीर झालेला नसतो, हा मोठा सामाजिक संदेश त्यांनी दिला आहे." या यशस्वी उपक्रमासाठी महेंद्र बारवाल, राहुल मांडे, रामहरी दहिफळे, सविता म्हस्के, रीता मार्कंडे, अनिता राठोड, राजू खिल्लारे, संगीता काकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.