Lion sighting at Siddhartha Udyan after 20 years
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात तब्बल २० वर्षांनंतर आता बच्चे कंपनीला सिंह दिसणार आहे. शनिवारी पहाटेच कर्नाटकच्या शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयातून सिंहाच्या जोडीसह कोल्हे आणि अस्वलाची जोडी प्राणिसंग्राहालयात दाखल झाली आहे. त्यामुळे आता उद्यानाच्या अकर्षणात भर पडणार आहे.
सेंट्रल झू ॲथॉरेटीच्या मंजुरीनंतर कर्नाटकातील शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयातून दोन सिंह, दोन अस्वल आणि दोन कोल्हे सिद्धार्थ उद्यानात दाखल झाले आहेत.
आता या प्राण्यांच्या बदल्यात सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयातून सोमवारी शिवमोग्गाला एक पांढरा नर वाघ आणि दोन पिवळ्या वाघीण पाठविण्यात येणार आहेत. मागील तीन महिन्यांपासून हे प्राणी अदलाबदलासाठी सिद्धार्थ उद्यान आणि शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयात संवाद सुरू होता. दीड महिन्यापूर्वी शिवमोग्गाचे पथक शहरात येऊन उद्यानातील वाघांची पाहणी देखील करून गेले.
त्यानंतर गेल्या आठवड्यातच सिद्धार्थ उद्यानाचे पथक शिवमोग्गाला भेट देत सिंह, कोल्हे आणि अस्वलाची पाहणी केली होती. त्यानंतर २५ सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजता शिवमोग्गातून प्राणी वनपरिक्षेत्र अधिकारी नागेश बलेगर आणि पशुवैद्यक डॉ. मुरली मनोहर यांच्या देखरेखीत हे सहा प्राणी रवाना करण्यात आले. तब्बल दोन दिवसांच्या प्रवासानंतर २७ सप्टेंबर रोजी पहाटे हे प्राणी शहरात दाखल झाले. सकाळी ८ वाजता त्यांना सुरक्षितरीत्या सिद्धार्थ उद्यानातील पिंजर्यात टाकण्यात आले.
तब्बल दोन दिवसांच्या प्रवासानंतर सिद्धार्थ उद्यानात दाखल झालेल्या प्राण्यांची सर्वपथम आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना नियमित पद्धतीचा आहार देण्यात आला. अस्वलांच्या पिंजऱ्यात झोका आणि खेळणी ठेवण्यात आली आहेत. तसेच २४ तास देखरेखीची व्यवस्था केली आहे.
प्राणिसंग्रहालयात दाखल झालेल्या या नव्या प्राण्यांचे दर्शन दोन दिवसांनंतरच नागरिकांना करता येणार आहे. त्यांना येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किमान दोन दिवस लागेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.