Kannad taluka leopard terror
हतनूर : कन्नड तालुक्यातील हतनूरसह टापरगाव गावात वावर असलेल्या बिबट्याने परिसरात दहशत माजवली. बिबट्याने हतनूर परिसरातील टापरगाव येथे सोमवारी (दि.२२) मध्य रात्री मेंढ्याच्या कळपावर हल्ला केला. यात तीन मेंढ्या ठार झाल्या.
कन्नड तालुक्यातील हतनूर परिसरातील टापरगाव येथील शेतकरी सतिश नलावडे यांच्या शेतात मेंढपाळ काशिनाथ दत्तू दगडे यांनी आपल्या मेंढ्या चरण्यास सोडले आहेत. याठिकाणी रात्री मेंढ्यांच्या कळपाला चहुबाजूंनी जाळी बांधलेली असताना रात्री १२:३० च्या सुमारास मेंढ्याच्या कळपावर हल्ला केला.
यात तीन मेंढ्या ठार झाल्या. तसेच एका कुत्र्यावर देखील हल्ला करून ठार केले. बैलगाडी खाली मेंढपाळाचा परिवार झोपेत होता. यावेळी मेंढपाळ काशिनाथ दगडे प्रसंगावधान राखून बिबट्याला पळवून लावल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या सर्व प्रकारामुळे मेंढपाळांसह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेंढपाळाचे मोठे नुकसान झाले आहे. आम्ही सर्व मेंढपाळ या परिसरात आपल्या मेंढ्यांना चरायला आणतो. मात्र, आता बिबट्याच्या वावर असल्यामुळे आम्ही चिंतेत आहोत, असे मेंढपाळ सांगतात. वन विभागाने या ठिकाणी बिबट्या चा बंदोबस्त करण्यात यावा. तसेच इतर उपाययोजनाही करून झालेल्या नुकसान ची भरपाई देण्यात यावी, अशी मागणी मेंढपाळ काशिनाथ दगडे यांनी केली आहे.