Leopard kills calf in Bhindon
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : सातारा-देवळाई परिसरातील डोंगर रांगेत बिबट्याचे वास्तव्य असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, शहरालगतच्या भिदोन येथे बिबट्याने एका वासराचा फडशा पाडल्याची घटना बुधवारी (दि.१८) पहाटे उघडकीस आली.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने तातडीने या भागात फिरून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. तर शहरातील उल्कानगरी भागातील श्रीनगर कॉलनीत बिबट्याचे दर्शन झाल्याची अफवा पसरली. मात्र बिबट्या ऐवजी मोठे मांजर निघाले. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
शहरालगच्या भिंदोन येथील संतोष शिंदे यांच्या वासराचा बुधवारी पहाटे बिबट्याने फडशा पाडल्याचे समोर आले. या परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आल्याने वन परिक्षेत्र विभागाच्या उपवन संरक्षक सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वन संरक्षक आशा चव्हाण यांच्या नेतृत्व ाखाली वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सिंदोन-भिंदोनसह सातारा-देवळाईच्या डोंगर रांगेचा परिसर पिंजून काढला. तसेच या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले.
दरम्यान, शहरात गेल्या एक ते दीड वर्षात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. उल्कानगरीतील ऑगस्ट होमजवळ तब्बल तीन दिवस बिबट्याने या भागात मुक्काम ठोकला होता. वन विभागाचे पथक दिवस-रात्र बिबट्यावर पाळता ठेवून होते, मात्र बिबट्या नाल्या-नाल्याने पसार झाला होता. त्यानंतर चारा महिन्यांपूर्वीच कठेपठार डोंगरात बिबट्याचे दर्शन झाले होते. बिबट्याचे या भागात वास्तव्य असल्याने कुठे ना कुठे बिबट्या दिसून येत आहे. दरम्यान, उल्कानगरी भागातील श्रीनगर कॉलनीमध्येही मध्यरात्रीच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या दिसून आल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावरून शहरात मोठी खळबळ उडाली.
तो बिबट्या नव्हे मांजर
उल्कानगरी भागातील श्रीनगर कॉलनीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या दिसून आल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यामुळे भयभीत झालेल्या या भागातील नागरिकांनी रात्र जागून काढली. त्यानंतर सकाळी या परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना या संदर्भात माहिती दिली. त्यावरून त्यांनी तातडीने वन विभागाच्या पथकाला श्रीनगर कॉलनीत पाठवले. यावेळी वनविभागाच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता त्यात तो बिबट्या नसून, मोठी मांजर असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी सागर कुटे यांनी सांगितले.