Chhatrapati Sambhajinagar Child Attacked by Leopard
कन्नड : सासेगाव (ता. कन्नड) येथे दहावीत शिकणाऱ्या मुलावर बिबट्याच्या पिल्लाने हल्ला केल्याची घटना घडली. मुलाने प्रसंगावधान राखत हातातील बादलीने हातवारे करत स्वतःचा जीव वाचवला. सासेगाव परिसरात मागील आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
ओमकार संजय घुगे हा शुक्रवारी (दि.२०) गुरांना चारापाणी करण्यासाठी शेतात गेला होता. यावेळी मुरघास असलेल्या भोद मध्ये बिबट्याचे पिल्लू बसलेले त्याला आढळले. त्याला काही कळण्याच्या आतच त्या पिलाने त्याच्यावर झडप टाकली. मात्र त्याने हातातील बादलीने बिबट्याच्या पिलाकडे हातवारे करून स्वतःचे रक्षण केले. यामुळे पिल्लू ही घाबरले. यावेळी ओमकारच्या अंगावर पिल्ल्याच्या पंजाचे ओरखडे उठले.
या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी टोम्पे यांनी ओमकार याची घरी येऊन विचारपूस केली. यावेळी परिसरातील बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
मी जेव्हा गुरांना चारापाणी करण्यासाठी गेलो तेव्हा मुरघास असलेल्या भोद मधून कुत्र्याच्या आकाराचे बिबट्याचे पिल्लाने माझ्यावर झडप घातली. यावेळी मी हातातील बकेटने हातवारे केले. मात्र, यावेळी हातातील बकेट बाजूला पडून गेली तर पिल्लाने दोन्ही पाय माझ्या छातीवर ठेवून उभे राहिले. मात्र, मी यावेळी त्याचे नरडे दाबून धरल्याने त्याला माझ्या मानेला धरता आले नाही. मी पायाने प्रतिकार करून बाजूला झालो. त्यानंतर पिल्लू पळून गेले. ही झुंज सात ते आठ मिनिट पर्यंत सुरु होती, अशी आपबिती ओमकार घुगे यांनी सांगितली.
सासेगाव येथील ओमकार व कुटुंबीयांची भेट घेतली. ओमकार सुखरूप आहे. मुलास व कुटुंबाला धीर देऊन सर्व घटनेचा आढावा घेतला आहे. या ठिकाणी वन कर्मचारी यांचे पथक गस्तीवर आहे. गावातील लोकांमध्ये जनजागृती केली जात आहे. उपाय योजना कारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.- शिवाजी टोम्पे वनपरिक्षेत्र अधिकारी कन्नड