Legislative Council Election : शिरसाठ, लोखंडे यांचे भवितव्य मतपेटीत बंद file photo
छत्रपती संभाजीनगर

Legislative Council Election : शिरसाठ, लोखंडे यांचे भवितव्य मतपेटीत बंद

विधान परिषद निवडणूक : वंचितच्या चार नगरसेवकांचा मतदानावर बहिष्कार; ६३७ पैकी ६३० जणांचे मतदान, सोमवारी मतमोजणी

पुढारी वृत्तसेवा

Legislative Council Election: Fate of Shirsath and Lokhande sealed in the ballot box

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा विधान परिषदेच्या औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी गुरुवारी (दि.१८) छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील १३ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. दोन्ही जिल्ह्यांत ६३७ पैकी ६३० सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. यासोबतच महायुतीचे सुहास शिरसाठ आणि महाविकास आघाडीचे गणेश लोखंडे या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. आता सोमवार, (दि. २२) रोजी शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाच्या केंद्रावर मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीच्या ४ नगरसेवकांनी मतदानावर बहिष्कार टाकला. महाविकास आघाडीने नांदेड येथे वंचितच्या उमेदवाराला मदत केली नाही, त्यामुळे त्यांना मतदान दिले नाही आणि आम्ही भाजपलाही मतदान करू शकत नव्हतो, त्यामुळे हा बहिष्कार टाकल्याचे वंचितच्या नगरसेवकांनी सांगितले. औरंगाबाद-जालना स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात एकूण तीन उमेदवार होते. यामध्ये महायुतीकडून भाजपचे सुहास शिरसाट, महाविकास आघाडीकडून ठाकरे सेनेचे गणेश लोखंडे आणि अपक्ष उमेदवार इसाक खान सांडू खान यांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील १३ मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत बॅलेट पेपरवर मतदान नोंदविले गेले. दोन्ही जिल्ह्यात ६३७ मतदार होते. त्यापैकी ६३० जणांनी मतदान नोंदविले. छत्रपती संभाजीनगर तहसीलच्या केंद्रांवर सर्वाधिक १३७ मतदान होते. तिथे १३२ जणांनी मतदान केले. तसेच पैठण आणि भोकरदनच्या केंद्रावर प्रत्येकी एक मतदान कमी नोंदवले गेले. सर्व तेरा केंद्रांवर सरासरी ९८.९० टक्के मतदान झाले. आता सोमवारी (दि.२२) मतमोजणी होणार आहे. ही मोजणी छत्रपती संभाजीनगरातील शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात होणार आहे..

व्हिल चेअरअभावी नगरसेविकेला उचलून नेण्याची वेळ

छत्रपती संभाजीनगर तहसीलच्या मतदान केंद्रांवर सकाळी भाजपचे नगरसेवक पोहोचले. यावेळी नगरसेविका सत्यभामा शिंदे यांना पाठीचा त्रास आणि इतर कारणांमुळे चालता येत नव्हते. व्हिलचेअरची मागणी करण्यात आली, परंतु ती उपलब्ध नव्हती. त्यामुळे शिंदे यांना काही नगरसेवकांनी उचलून मतदान केंद्रात नेले. या गैरसोयीबद्दल भाजप नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

मतदारांची शेवटपर्यंत मनधरणी

महानगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचे ४ आणि काँग्रेसची एक महिला नगरसेवक आहे. दुपारी २ वाजेपर्यंत हे नगरसेवक मतदानाला आले नव्हते. मतदानाला येण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून या नगरसेवकांची मनधरणी सुरू होती. परंतु या प्रयत्नांना यश आले नाही. दुपारी ४ वाजेपर्यंत या ५ पैकी एकही नगरसेवक मतदान केंद्राकडे फिरकला नाही. पैठण येथील १ आणि भोकरदन येथील १ असे एकूण सात मतदार मतदानाला गैरहजर राहिले.

सामान्यांना कार्यालयात प्रवेश बंदी

छत्रपती संभाजीनगर शहरात तहसील कार्यालयात मतदान केंद्र होते. मतदानामुळे प्रचंड पोलिस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयापासून रजिस्ट्री कार्यालयापर्यंत बॅरिकेटिंग करण्यात आली होती. कुणालाही आत प्रवेश दिला जात नव्हता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय कार्यालय, तहसील कार्यालय, रजिस्ट्री कार्यालय या ठिकाणी कामानिमित्त आलेल्या नागरिकांना आत प्रवेश मिळू शकला नाही. परिणामी, या नागरिकांना परत जावे लागले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT