Land mafias eye 2,277 sq. m. of Municipal Corporation land
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पदमपुरा-बन्सीलालनगर परिसरातील नगर भूमापन क्रमांक १९४४६, सर्व्हे क्रमांक ३२/१ मधील २२७७ चौरस मीटर ही महापालिकेच्या मालकीची खुली जागा आहे. त्यावर भूमाफियांनी अतिक्रमण करुन जागा बळकावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तातडीने महापालिकेने अतिक्रमण काढून जागा ताब्यात घ्यावी, अशी मागणी माजी महापौर तथा नगरसेविका अनिता नंदकुमार घोडेले यांनी नुकत्याच झालेल्या सर्वसाधरण सभेत केली आहे.
मनपाच्या १३ नोव्हेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रश्न क्रमांक २७७ अंतर्गत या जागेबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावर उपसंचालक नगररचना यांनी संबंधित जागा मनपाच्या मालकीची खुली जागा असल्याचा खुलासा केला. तसेच जागेवर अनधिकृतपणे उभारलेले पत्र्याचे कुंपणही बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगररचना विभागाने ई-संचिका क्रमांक ३६८२८३३ मध्ये यासंदर्भातील सर्व बाबी नमूद करून पुढील कारवाईसाठी अतिक्रमण विभागाकडे शिफारस केली आहे. त्यामुळे आता अतिक्रमण विभागाने तातडीने कारवाई करून जागा मनपाच्या ताब्यात घ्यावी आणि तारेचे कुंपण घालावे, अशी मागणी नगरसेविका घोडेले यांनी केली आहे. कोट्यवधी रुपये किमतीची ही जागा भूमाफियांच्या ताब्यात जाण्यापूर्वी प्रशासनाने संरक्षण करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.