Land Mafia : वाळूज भागात भूमाफियांचा धुमाकूळ File Photo
छत्रपती संभाजीनगर

Land Mafia : वाळूज भागात भूमाफियांचा धुमाकूळ

दीड कोटींची जमीन हडपण्याचा कट, ८ जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

Land mafia in Waluj area plot to grab land worth Rs 1.5 crore, 8 people charged

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : वाळूज औद्योगिक क्षेत्र आणि परिसरात जमिनीचे भाव गगनाला भिडले असल्याने भूमाफिया सक्रिय झाले आहेत. महसूल अभिलेख्यांतील जुटी आणि सातबाऱ्यावरील पोकळीस्त नोंदींचा गैरवापर करून तब्बल दीड कोटी रुपयांची जमीन हडप करण्याचा प्रयत्न वाळूजमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात ८ जणांविरुद्ध फसवणूक आणि अतिक्रमणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुधानोरा (ता. गंगापूर) येथील गट क्रमांक ८४ मधील ५ एकर २५ गुंठे जमीन फिर्यादी राजू ऊर्फ राजकुमार अल्गर स्वामी (रा. पंढरपूर, सध्या रा. तामिळनाडू) यांनी २००७ मध्ये कायदेशीर खरेदीखताद्वारे घेतली होती.

या शेताला सिमेंट पोल आणि तार कुंपण केलेले आहे. मात्र, २६ फेब्रुवारी २०२६ रोजी काही लोकांनी हे कुंपण तोडून नवीन कुंपण उभारण्यास सुरुवात केली. फिर्यादीच्या पुतणीने पोलिसांसह घटनास्थळी जाऊन जाब विचारला असता, 'ही जमीन आम्ही विकत घेतली आहे,' असे सांगत आरोपींनी दमदाटी केली.

कागदपत्रांची पडताळणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. मूळ जमीनधारकांकडे जमीन शिल्लक नसतानाही सातबाऱ्यावरील पोकळीस्त नोंदी आणि चुकीच्या चतुर्सीमांचा आधार घेत २०२३ व २०२४ मध्ये अनुक्रमे ३८ व ५५ गुंठ्यांची दोन बोगस खरेदीखते करण्यात आली. पुढे हीच ९३ गुंठे जमीन २०२५ मध्ये फिरोजखाँ पठाण (रा. वाळूज) याला विकण्यात आली.

यांच्यावर झाला गुन्हा दाखल

याप्रकरणी राजू स्वामी यांच्या फिर्यादीवरून फिरोजखाँ पठाण, शरद पवार, ज्ञानेश्वर मोगल, रामेश्वर चिडे आणि मूळ जमीनधारक हरिचंद्र, रंजना, शांताबाई व नंदू चक्रनारायण (सर्व रा. गंगापूर तालुका) अशा आठ जणांविरुद्ध कट रचणे व फसवणुकीचा गुन्हा वाळूज पोलिसांत दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक शिवचरण पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संभाजी गोरे पुढील तपास करत आहेत. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली असून सखोल चौकशीची मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT