Kumbh Mela 2027: District development plan worth Rs 9,633 crore prepared
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर, वेरूळ, पैठण आणि आपेगाव या क्षेत्रांचा सर्वसमावेशक विकास आर-ाखडा तयार करण्यात यावा. जिल्ह्याच्या शाश्वत विकासास चालना मिळून पर्यटनाचा लौकिक देशभर वाढावा, असे निर्देश शुक्रवारी (दि.३१) जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिले. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस इमाव मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड, खा. डॉ. कल्याण काळे, आ. विक्रम काळे, आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरणारे, आ. विलास भुमरे, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, मुख्य अभियंता अतुल चव्हाण व अन्य विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
या बैठकीत प्रशासनाने ९,६३३ कोटींचा सादर केलेल्या व्यापक विकास आराखड्यानुसार, वेरूळ छत्रपती संभाजीनगर विकासासाठी ७१२६ कोटी २९ लाख व पैठण-आ पेगावसाठी २५०७ कोटी २२ रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला. अंदाजे एक कोटी भाविक कुंभमेळा कालावधीत जिल्ह्यात येतील, याचा विचार करून नियोजन करण्यात आले आहे. यात वाहतूक व्यवस्था १३० हेक्टर क्षेत्रावर पार्किंग व निवास व्यवस्थेचे नियोजन. महामार्गलगत पार्किंग स्थळे, रस्ते रुंदीकरण, वन वे मार्ग, फेरी बसेस, ई-रिक्षा सेवा, डिजिटल सिग्नल्स, ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन तसेच शुद्ध पाण्याची व्यवस्था, आरोग्य केंद्रे, माहिती केंद्रे, स्वच्छतागृहे, तात्पुरती धर्मशाळा व तंबू शिबिरे, अन्नक्षेत्र आणि हॉटेल बुकिंगसाठी क्यूआर कोड सुविधांचा समावेश आहे.
तर सीसीटीव्ही, ड्रोन निगराणी, महिला हेल्पलाईन, आपत्ती प्रतिसाद पथके, हेलिपॅड व नियंत्रण कक्ष उभारणी आणि वेरुळ लेणी व मंदिर परिसरात प्रकाश योजना, मोफत वायफाय, बहुभाषिक मार्गदर्शन, पर्यटक अॅप व पोर्टल्स, स्थानिकांना रोजगार आणि अधिकृत विक्री स्टॉल्सची सोय असणार आहे. यावेळी आ. प्रशांत बंब यांनी आराखडा सर्वसमावेशक ठेवण्याची सूचना केली. तर आ. विक्रम काळे यांनी पार्किंग स्थळांहून सार्वजनिक वाहतूक सोयीची मागणी केली. तसेच खा. डॉ. कल्याण काळे यांनी स्थानिक उत्पादने व रोजगाराच्या संधींचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला, खा. डॉ. कराड यांनी भद्रा मारुती क्षेत्राचाही समावेश करण्याची सूचना केली. यासह मंत्री अतुल सावे यांनी रस्ते, वीज वितरण आणि पर्यटक सुविधा यांवर विशेष भर देण्याची सूचना केली. प्रास्ताविक आणि आभार जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी तर सूत्रसंचालन नियोजन अधिकारी भारत वायाळ यांनी केले.
तातडीने अंतिम प्रस्ताव तयार करा
या आराखड्यातून जिल्ह्याचा शाश्वत विकास आणि पर्यटनाचा नवा अध्याय लिहिला जावा. पर्यटकांच्या सुरक्षेला आणि सुविधा निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य द्या व तातडीने अंतिम प्रस्ताव तयार करा, असे आदेश पालकमंत्री शिरसाट यांनी प्रशासनाला दिले.