Sambhajinagar News : दंड लावताच पोलिसांवर उगारला चाकू File photo
छत्रपती संभाजीनगर

Sambhajinagar News : दंड लावताच पोलिसांवर उगारला चाकू

पोलिसांना गळा कापण्याची धमकी; रेल्वेस्टेशन चौकात राडा, दुचाकीवर बनावट नंबर

पुढारी वृत्तसेवा

Knife pointed at police after fine imposed

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : दुचाकीवर बनावट नंबर टाकल्याने चौकशी करून कारवाई करणाऱ्या वाहतूक पोलिसांवर एकाने चाकू उगारत जिवे मारण्याची धमकी देत भरचौकात राडा केला. हा प्रकार सोमवारी (दि.२९) रात्री ८ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशन चौकात घडला. चैतन्य कैलास गायकवाड (२२, रा. साजापूर) आणि त्याचा साथीदार मोसीन घुणावत शेख अशी आरोपींची नावे आहेत.

वाहतूक शाखेचे अंमलदार पवन हराळ, पातोडे आणि सुंदर्डे हे रात्री ८ वाजेच्या सुमारास रेल्वेस्टेशन ट्रॅफिक पोलिस चौकीजवळ ड्यूटीवर होते. त्यांनी संशयास्पद वाटलेली एक पल्सर दुचाकी (एमएच-२०-एफएक्स-७२२२) थांबवून ई-चालान मशीनवर तपासली. तेव्हा त्या गाडीचा मूळ नंबर (एमएच ५७-ए-२१७४) असल्याचे समोर आले.

म्हणजेच, आरोपी बनावट नंबर प्लेट लावून शहरात बिनधास्त फिरत असल्याचे यातून उघड झाले. पोलिसांनी या बनावट नंबरबाबत जाब विचारून दंडात्मक कारवाई सुरू करताच आरोपी चैतन्यने भरचौकात गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्याने वाहतुकीला अडथळा ठरेल, अशा रीतीने गाडी उभी करून पोलिसांना अश्लील शिवीगाळ करत खिशातील चाकू काढला. "मला सोडा, नाही तर तुम्हाला मारीन किंवा स्वतःचा गळा कापेन," अशी धमकी देत त्याने भररस्त्यात राडा केला.

विशेष म्हणजे त्याचा साथीदार मोसीन हा या सर्व प्रकाराचा व्हिडिओ बनवत होता. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अंमलदार पातोडे यांनी चैतन्यवर झडप घालून त्याच्या हातातील चाकू जप्त केला. याप्रकरणी वेदांतनगर ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार प्रभाकर शिरसाठ पुढील तपास करत आहेत.

चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यातील दुचाकी

आरोपीची दुचाकी जालना येथे दाखल असलेल्या चेनस्नॅचिंगच्या गुन्ह्यातील असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या दुचाकी आणि आरोपीकडून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT