Knife attack on vendor after eating free panipuri from gangster
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातून तडीपार असलेल्या एका गुंडाने फुकट पाणीपुरी खाऊन, वरून पैशांची मागणी केली आणि पैसे न दिल्याच्या रागातून पाणीपुरी विक्रेत्याच्या मांडीवर दाबेली कापण्याच्या चाकूने वार करून गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता या नशेखोर गुंडाने व्यापाऱ्यांकडे पैशांची मागणी करत गॅस सिलिंडर फोडून स्फोट करण्याची धमकी देत मोठा राडा घातला. हा वाद सोडवण्यासाठी मध्ये पडलेल्या दाबेली विक्रेत्याच्या हातावरही चाकूने वार केला. ही घटना सोमवारी (दि.५) रात्री ९ वाजेच्या सुमारास अहिल्याबाई होळकर चौकात घडली. याप्रकरणी वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशाल ऊर्फ विशू संजय नाथभजन (२३, रा. क्रांतीनगर, बुद्धविहाराच्या पाठीमागे) असे या तडीपार गुंडाचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस निरीक्षक मुकुंद पालवे यांनी दिली.
फिर्यादी पाणीपुरी विक्रेता विनोद कुमार शामकुमार बाथम (४०, रा. देवगिरी कॉलनी) यांच्या तक्रारीनुसार, त्यांची अहिल्याबाई होळकर चौकात पाणीपुरीची गाडी असून, त्यांच्या शेजारीच ज्ञानेश्वर परसराम पवार यांची दाबेलीची गाडी लागते. सोमवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास आरोपी विशाल नाथभजन तिथे आला आणि त्याने विनोद यांच्याकडे पाणीपुरी मागितली. फुकट पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्याने विनोद यांच्याकडे पैशांची मागणी केली. विनोद यांनी त्याला ५० रुपये दिले, मात्र त्याने आणखी पैशांची मागणी केली. माझ्याजवळ पैसे नाहीत असे विनोद सांगत असताना त्याने शिवीगाळ सुरू केली.
दाबेली कापण्याचा चाकू घेऊन मांडीवर वार
वाद वाढल्यानंतर आरोपी विशाल हा शेजारील ज्ञानेश्वर पवार यांच्या दाबेलीच्या गाडीवर गेला आणि तिथून पाव कापण्याचा चाकू हातात घेऊन आला. त्याने या चाकूने थेट विनोद यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर जोरात वार करून त्यांना गंभीर जखमी केले. विनोद यांना वाचवण्यासाठी ज्ञानेश्वर पवार मध्ये पडले असता, आरोपीने त्यांच्याही हातावर चाकूचा वार करून जखमी केले आणि जीवे मारण्याची धमकी देऊन तेथून पसार झाला. या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार दिलीपकुमार शेवाळे हे करत आहेत.
सिलिंडरचा स्फोट करण्याचा प्रयत्न
गुंड विशाल हा नशेखोर आहे. तडीपार असताना तो या परिसरात नेहमी व्यापारी, विक्रेत्यांकडे पेशांची मागणी करुन धमक्या देतो. यात त्याने पैसे न दिल्यास विक्रेत्यांचे सिलिंडर फोडण्याची धमकी देत राडा घातला. नागरिकांनी अग्निशमनला कॉल केल्याचेही समोर आले आहे.
तडीपार गुंड तरीही मोकाट
जखमी अवस्थेत बाथम आणि पवार यांनी वेदांतनगर पोलिस ठाणे गाठले आणि तिथून घाटी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. या घटनेनंतर आरोपी विशाल नाथभजन याला शहरातून पोलिसांनी मार्च महिन्यातच तडीपार केल्याचे समोर आले. तरीही तो बिनधास्तपणे हद्दीतच फिरून पुन्हा दहशत निर्माण करत होता.