खुलताबाद : खुलताबाद-छत्रपती संभाजीनगर रोडवरील नंद्राबाद गावाजवळ बुधवारी (दि.१) दुपारच्या सुमारास आयशर ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने बाप लेकाचा जागीच मृत्यू झाला, तर पत्नी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. किशोर सोमीनाथ सोनवणे (३१) व शिव किशोर सोनवणे (एक वर्ष) अशी मृतांची नावे आहे.
पूजा किशोर सोनवणे (२७) या गंभीर जखमी झाल्या आहेत. हे कुटुंब मूळचे वरझडी फाटा (ता. गंगापूर) येथील रहिवासी असून, सध्या कागजीपुरा येथे वीटभट्टीवर मजुरीचे काम करत होते. बुधवारी खुलताबाद येथील आठवडा बाजारासाठी तिघे दुकारीवरून निघाले होते.
नंद्राबाद गावाजवळील वळ-णावर खुलताबादहून येणाऱ्या आयशर ट्रकने (एमएच २१-बीएच-४३३८) दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात किशोर सोनवणे व त्यांचा एक वर्षाचा मुलगा शिव यांचा मृत्यू झाला, तर पत्नी पूजा या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान, जखमी महिलेवर उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.