Verul Tirthkunda : वेरूळच्या तीर्थकुंडातून पवित्र जल घेऊन कावडधारक मार्गस्थ file photo
छत्रपती संभाजीनगर

Verul Tirthkunda : वेरूळच्या तीर्थकुंडातून पवित्र जल घेऊन कावडधारक मार्गस्थ

'बम बम भोले' च्या जयघोषाने वेरूळपासून पिनाकेश्वर डोंगरापर्यंतचा परिसर शिवमय

पुढारी वृत्तसेवा

Kavadhars carrying holy water from Verul Tirthkunda

वेरुळ, पुढारी वृत्तसेवा : वेरूळ येथील अहिल्यादेवी होळकर तीर्थकुंडातून पवित्र जल घेऊन रविवारी (दि. ३०) लाखो शिवभक्त पिनाकेश्वर महादेव (जातेगाव) च्या दिशेने मार्गस्थ झाले. भोपळ्यात पवित्र तीर्थजल घेऊन कावड खांद्यावर घेत भाविकांनी पायी वाटचाल केली. तिसऱ्या श्रावण सोमवारच्या पार्श्वभूमीवर पहाटेपासूनच तीर्थकुंड परिसर भाविकांच्या गर्दीन फुलून गेला होता. 'हर हर महादेव', 'बम बम भोले'च्या जयघोषाने वेरूळपासून पिनाकेश्वर डोंगरापर्यंतचा परिसर शिवमय झाल्याचे चित्र दिसून आले.

अजिंठा-सातमाळा डोंगररांगांच्या कुशीत वसलेले पिनाकेश्वर अर्थात मोठा महादेव मंदिर नाशिक जिल्ह्याच्या हद्दीत असून, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमा पिनाकेश्वर डोंगरालगतच आहेत. त्यामुळे या परिसराला धार्मिक तसेच भौगोलिकदृष्ट्याही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

श्रावणातील तिसऱ्या सोमवारी वेरूळ येथील अहिल्यादेवी होळकर तीर्थकुंडातून पवित्र जल घेऊन ते पिनाकेश्वर महादेवाला अर्पण करण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. मंदिराचा जीर्णोद्धार पिनाकेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारालाही श्रद्धेची मोठी परंपरा लाभली आहे. १९६५-६६ च्या सुमारास राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे अंदरसूल येथून पिनाकेश्वर डोंगरावर आगमन झाले.

१९६६ मध्ये त्यांनी येथील प्राचीन लाकडी मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला. त्यांच्या प्रेरणेने शिवभक्तांनी श्रमदानातून दगडी मंदिराचे बांधकाम पूर्ण केले. १९६७ मध्ये संत जनार्दन स्वामी यांच्या हस्ते मंदिरातील नवीन मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 'पिनाकेश्वर' नावामागे आख्यायिका पिनाकेश्वर महादेव देवस्थानाबाबत अनेक आख्यायिका प्रचलित आहेत.

प्रभू रामचंद्र वनवासाच्या काळात नाशिककडे जात असताना या ठिकाणी मुक्कामी थांबले होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. प्रभू रामचंद्र हे शिवभक्त असल्याने त्यांनी येथे शिवपूजा केली. त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवांनी त्यांना पिनाक अस्त्र दिले. त्यामुळे या स्थानाला पुढे 'पिनाकेश्वर' हे नाव पडले, अशी आख्यायिका सांगितली जाते.

सेवेसाठी ग्रामस्थ सरसावले

पिनाकेश्वरकडे पायी जाणाऱ्या कावडधारकांच्या सेवेसाठी गल्लेबोरगाव, लव्हाळी टाकळी, औराळा, जेहूर, बोलठाण आणि जातेगाव या मार्गावर महाप्रसाद, चहा, नाश्ता व फलाहाराचे वाटप करण्यात आले-

खांद्यावर कावड, मुखी महादेवाचा जयघोष

तीर्थकुंडातून पवित्र जल घेतल्यानंतर महिला, पुरुष, तरुण तसेच ज्येष्ठ भाविकांनी कावड खांद्यावर घेत पिनाकेश्वरच्या दिशेने पायी वाटचाल सुरू केली. अनेक भाविकांनी कावडी, काठ्या पारंपरिक पद्धतीने सजवल्या होत्या. दिवसभराचा पायी प्रवास करून भाविक सोमवारी सकाळपर्यंत पिनाकेश्वर डोंगरावर पोहोचतात. तेथे शिवलिंगावर पवित्र जल अर्पण करून महादेवाचे दर्शन घेतात. अनेक वर्षांपासून चालत आलेली ही श्रद्धेची परंपरा आजही भाविक मोठ्या भक्तिभावाने जोपासत आहेत-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT