Vadgaon knife attack : वडगाव चाकू हल्ल्यातील जखमी करणचा मृत्यू; अज्ञातांकडून आरोपीचे घर खाक, तिघांना बेड्या File Photo
छत्रपती संभाजीनगर

Vadgaon knife attack : वडगाव चाकू हल्ल्यातील जखमी करणचा मृत्यू; अज्ञातांकडून आरोपीचे घर खाक, तिघांना बेड्या

पहाटे एका आरोपीचे घर पेटवून दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुढारी वृत्तसेवा

Karan, injured in the Vadgaon knife attack, passes away; unidentified individuals set fire to the accused's house, three arrested.

वाळूज महानगर, पुढारी वृत्तसेवा : वडगाव कोल्हाटी येथे जुन्या वादातून गुरुवारी (दि. ३०) झालेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेला तरुण करण गायकवाड याचा शुक्रवारी (दि. १) उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, संतप्त अज्ञातांनी शनिवारी (दि. २) पहाटे एका आरोपीचे घर पेटवून दिल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मयत करण गायकवाड याला जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, मेहुणीच्या लग्नासाठी पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी तो जालन्याहून वडगावला आला होता. गुरुवारी दुपारी लक्ष्मीमाता मंदिराजवळील मैदानात अजय राजू दहातोंडे, ओंकार ऊर्फ सोन्या त्रिभुवन, अभिजीत फाटे आणि किरण घुमरे यांनी त्याला गाठले. तू आमच्याशी पंगा घेतो का? असे म्हणत अजय आणि अभिजीतने त्याच्या पाठीवर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या करणचा शुक्रवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घाटी रुग्णालयात मृत्यू झाला.

गुन्हा घडल्यानंतर पसार झालेल्या आरोपींच्या मागावर पोलीस होते. पोलिसांनी शुक्रवारी अजय दहातोंडे व अभिजित फाटे यांना वडगाव शिवारातील एका शेतातून, तर ओंकार त्रिभुवन याला तिसगावच्या खवड्या डोंगरावरून अटक केली. चौथा आरोपी किरण घुमरे अद्याप फरार आहे. तिन्ही आरोपींना ४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती तपासी अधिकारी नरेश ठाकरे यांनी दिली.

अज्ञातांनी आरोपीचे घर पेटवले

शुक्रवारी रात्री करणवर वडगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाच, शनिवारी पहाटे अज्ञातांनी मुख्य आरोपी अजय दहातोंडे याच्या घराला आग लावली. सुदैवाने घरात कोणीही नव्हते; मात्र या आगीत संसारोपयोगी साहित्य व कपडे जळून खाक झाले. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र याप्रकरणी अद्याप कुणीही तक्रार दाखल केलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT