कन्नड : कार्यालय निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क मकफ विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक अशोक साळुंखे, यांच्या पथकाने शहर व ग््राामीण भागात देवगाव रंगारी पोलिस स्टेशन हद्दीत 1 डिसेंबरपासून आजपर्यंत अवैध मद्यविक्री व वाहतुकीविरोधात धडक कारवाई करण्यात आली. या कालावधीत एकूण 12 गुन्हे नोंदविण्यात आले असून 2 लाख 36 हजार 455 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाईदरम्यान चिकलठाण, चापानेर, हसनखेडा फाटा, दाभाडी, ओराळा व देवगाव रंगारी परिसरात छापे टाकण्यात आले. यामध्ये देशी दारू, विदेशी दारू, हातभट्टी दारू, ताडी तसेच रसायनांचा साठा जप्त करण्यात आला आहे. काही प्रकरणांत दुचाकी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत.
नोंदविलेल्या गुन्ह्यांमध्ये चिकलठाण येथून देशी दारू भिंगरी संत्रा व संजीविनी संत्रा या बँडच्या शेकडो सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. चापानेर येथे हातभट्टी दारू जप्त करण्यात आली, तर देवगाव रंगारी येथे ताडी विक्रीप्रकरणी कारवाई करण्यात आली.
दाभाडी येथे मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारू व रसायनांचा साठा आढळून आला.या कारवाईत हातभट्टी दारू 35 लिटर, देशी दारू 8 बॉक्स, विदेशी दारू 1 बॉक्स, रसायन 200 लिटर, ताडी 145 लिटर तसेच 2 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक अशोक साळुंखे, स्मिता माने रामजीवन भारती, किरवले यांनी कारवाई केली.