कन्नडमध्ये महामार्गाच्या कामाविरोधात रास्तारोको 
छत्रपती संभाजीनगर

Kannad News : कन्नडमध्ये महामार्गाच्या कामाविरोधात रास्तारोको; ३२ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा

अधिकाऱ्यांसह कंत्राटदारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

कन्नड : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील उड्डाणपूल आणि बाह्यवळण रस्त्यांची कामे अत्यंत संथगतीने व सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करून सुरू असल्याचा आरोप करत, या कामांदरम्यान झालेल्या अपघातांत आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाल्याचा दावा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्षा स्वाती संतोष कोल्हे यांनी केला आहे. महामार्गाचे जबाबदार अधिकारी व कंत्राटदारावर तातडीने सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी त्यांनी मंगळवारी सव्वा तास रस्तारोको आंदोलन करण्यात आले. याबाबत त्यांनी पोलीस उपअधीक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्याकडे तक्रार निवेदनही दिले.

कोल्हे यांनी निवेदनात कन्नड शहर प्रवेश-निर्गम मार्ग, कारखाना उड्डाणपूल, अंधानेर टी-पॉईंट तसेच गल्ले बोरगाव बायपास उड्डाणपुलाच्या कामांबाबत आक्षेप नोंदवला. महामार्गावर काम सुरू असताना वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी ठरावीक अंतरावर ब्लिंकिंग लाईट्स, रेडियमयुक्त दिशादर्शक फलक, प्लास्टिक बंपर्स तसेच योग्य डायव्हर्शनची व्यवस्था करणे आवश्यक असते. मात्र, या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुन्हा अपघातात चार जखमी

दरम्यान, कारखाना साईटजवळ सोमवारी रात्री पुन्हा भीषण अपघात झाला. यात चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महामार्गाच्या कामातील गौण खनिजाच्या (मुरूम) कथित गैरव्यवहाराबाबतही कोल्हे यांनी आरोप केले असून, संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महामार्गावरील अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या त्रुटी दूर करून आवश्यक सुरक्षा साधने तातडीने उभारावीत, तसेच जबाबदार अधिकारी व कंत्राटदाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली. आंदोलनावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. अण्णा शिंदे, अशोक दापके, डॉ. सदाशिव पाटील, युवराज बोरसे, नवनाथ राठोड, यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

रस्त्याच्या खोदकामात निघणाऱ्या गौण खनिजाचा (मुरूम) बेकायदेशीर व्यवसाय करणारा एक स्थानिक राजकारणी कंत्राटदार आणि हायवेच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मध्यस्थी करत असल्याचा आरोपही पत्रात करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT