तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना रोजंदारी कामगार. pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Wage issue protest : कन्नड येथे रोजंदारी महिला मजुरांचे उपोषण

लहान मुलांसह कुटुंबीयांच्या सहभागामुळे प्रशासनावर दबाव वाढत असल्याचे चित्र

पुढारी वृत्तसेवा

कन्नड ः तालुका कृषी अधिकारी कार्यालयांतर्गत कृषी विभाग, कन्नड येथील नरसिंगपूर रोपवाटिकेतील रोजंदारी महिला मजुरांनी कायम नियुक्ती व ज्येष्ठता हक्काच्या मागणीसाठी सोमवार, दि. 23 फेब्रुवारीपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. सोमवारी या उपोषणाचा आठवा दिवस पूर्ण झाला.

उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की, सलग 240 दिवस सेवा बजावूनही त्यांना कायम नियुक्ती देण्यात आलेली नाही. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे व शासन निर्णयाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शासन नियमांनुसार सलग 240 दिवस सेवा पूर्ण केलेल्या कामगारांना सेवेत कायम करून ज्येष्ठता यादीत समाविष्ट करणे अपेक्षित असताना संबंधित मजुरांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याशिवाय, आर्थिक व्यवहारातून इतर काही कर्मचाऱ्यांना नियमित करण्यात आल्याचा गंभीर आरोपही उपोषणकर्त्यांनी केला आहे. कृषी विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, उपोषण करणाऱ्या महिलांना त्यांच्या कुटुंबीयांची साथ लाभत आहे. पती, मुले, सुना तसेच नातवंडेही उपोषणस्थळी उपस्थित राहत असल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. लहान मुलांसह कुटुंबीयांच्या सहभागामुळे प्रशासनावर दबाव वाढत असल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT