Kalidas Maharaj accident pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Kalidas Maharaj accident : गुंजचे कालिदास महाराज यांना देवाज्ञा, आज अंत्यसंस्कार

भालगाव फाट्याजवळ कार अपघातात मृत्यू, भावजयही ठार, भाविकांमध्ये शोककळा

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : परभणी जिल्ह्यातील गुंज (ता. पाथरी) येथील शिवाश्रमाचे मठाधिपती आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले प. पू. कालिदास महाराज ऊर्फ नारायण बोरीकर (६८) यांचे शुक्रवारी (दि. १७) पहाटे भीषण रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झाले. या अपघातात त्यांच्या लहान भावाची पत्नी स्मिता हणमंतराव बोरीकर (४८, रा. प्रतापगंज, सातारा) यांचाही मृत्यू झाला आहे. धुळे-सोलापूर महामार्गावर निपाणी भालगाव फाट्याजवळ चालकाचा ताबा सुटून कार दुभाजकाला धडकल्याने हा भयंकर अपघात झाला.

अधिक माहितीनुसार, कालिदास महाराज हे गुजरात येथे ज्येष्ठ संत टेंबे स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. धार्मिक कार्यक्रम आटोपून ते आपल्या सहकाऱ्यांसह गुंजकडे परतत होते. शुक्रवारी पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास त्यांची कार निपाणी भालगाव फाट्चादरम्यान आली.

यावेळी अचानक चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि भरधाव कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, कारच्या मागील सीटवर बसलेले कालिदास महाराज आणि त्यांच्या वहिनी स्मिता बोरीकर हे दोघेही गंभीर जखमी झाले. वाशिवाय महाराजांच्या दुसऱ्या लहान भावाचे जावई आशुतोष डुधरेकर हेही या अपघातात जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेत सर्वांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकव्हर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी तपासून कालिदास महाराज आणि स्मिता बोरीकर यांना मृत घोषित केले. तर जखमी आशुतोष डुघरेकर यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

दुभाजकाला धडकून कारच्या समोरील भागाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला होता. (इन्सेटमध्ये मरण पावलेल्या भावजय स्मिता बोरीकर या घटनेची माहिती सिडको आणि चिकलठाणा पोलिस ठाण्याला देण्यात आली. सिडको आणि चिकलठाणा पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन रीतसर इन्क्वेस्ट पंचनामा केला. त्यानंतर घाटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिका-यांकडून दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइ‌कांच्या ताब्यात देण्यात आले.

कालिदास महाराज बोरीकर यांच्या पार्थिवावर शनिवारी (दि.१८) सकाळी परभणी जिल्ह्यातील भौजे गुंज (ता. पाथरी) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली, महाराजांच्या निधनाने भाविकांत शोककळा पसरली असून, अनेकांनी गुंज कडे धाव घेतली आहे.

बोरी येथे जन्म, बालपणीच अध्यात्माकडे

कालिदास महाराज यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील बोरी येथे झाला होता, बाल-पणापासूनच त्यांच्या असलेला अध्यात्म ओवा त्यांना गुंज येथे असलेल्या दत्त संप्रदायाकडे घेवून आला. तेथे चिंतामणी महाराजांच्या प्रेरणेने त्यांनी ४० वर्षे अखंड मौनव्रत पाळले. ते भक्तांशी फक्त एका डायरीच्या माध्यमातून संवाद साधत असत. भक्त्तांच्या अडचणी ऐकून लिहून घेत असत, अशी माहिती भाविकांनी दिली. ते एकही शब्द न बोलता केवळ साध्या राहणीमानाने आणि करुणेने लोकांना व्यसनमुक्तीचा मार्ग दाखवत असत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT