Jumbo anti-encroachment campaign in the city after the Zilla Parishad, Mayoral elections
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषद व महापौर निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होताच शहरात अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांविरोधात पाडापाडीची जम्बो मोहीम हाती घेतली जाणार आहे. गेल्या चार महिन्यांपासून थांबलेली विकास आराखड्यातील (डीपी) रस्त्यांवरील कारवाई पुन्हा सुरू होणार असून, पहिल्या टप्प्यात शहरातील आठ महत्त्वाच्या डीपी रस्त्यांचे रुंदीकरण निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या उपायुक्त सविता सोन वणे यांनी दिली.
कारवाईत सहा डीपी रस्त्यांवरील साडेपाच हजारांहून अधिक अनधिकृत बांधकामे, दुकाने व अतिक्रमणे हटविण्यात आली. मात्र दसरा-दिवाळी सण, त्यानंतर मनपा निवडणूक जाहीर झाल्याने ही मोहीम तात्पुरती थांबविण्यात आली होती. दरम्यान २९ प्रभागांतून ११५ नगरसेवक निवडून आले असून, महापौर व उपमहापौर पदासाठी १० फेब्रुवारी रोजी विशेष सभा होणार आहे. तसेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारीला मतदान व ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शहरातील आठ डीपी रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटविण्याची मोहीम पुन्हा वेगाने राबवली जाईल, असे उपायुक्त सोनवणे यांनी स्पष्ट केले.
शहराच्या विकास आराखड्यातील रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण होत होते. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने चार महिन्यांपूर्वी मोठ्या प्रमाणावर पाडापाडी मोहीम राबवली होती. याकेले. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील पाडापाडी मोहिमेदरम्यान गोरगरिबांची घरे व लहान दुकाने पाडली गेली, तर काही ठिकाणी प्रभावशाली व्यक्तींची बांधकामे विविध कारणे पुढे करून वाचविण्यात आल्याचा आरोप होत होता. मात्र १० फेब्रुवारीनंतर प्रशासकराज संपुष्टात येणार असल्याने आता भूसंपादन नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार, अशी चर्चा शहरात रंगली आहे.
शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या रोशन गेट परिसरात अखेर रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून अतिक्रमणांमुळे रखडलेले काम नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत अडथळे दूर केल्याने पुन्हा सुरू होणार आहे. महापालिकेच्या इशाऱ्यानंतर गुरुवारी (दि.५) सकाळपासून अनेकांनी आपली वाढीव बांधकामे काढून टाकली.
रोशन गेट परिसरात दिवसेंदिवस वाढणारी वाहतूक आणि सततची कोंडी लक्षात घेऊन महापालिकेने येथे रस्ता रुंदीकरणाचा निर्णय घेतला होता. मात्र, रस्त्यालगत उभारण्यात आलेल्या ओट्या, शेड, पत्रे आणि इतर वाढीव बांधकामांमुळे प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकत नव्हते. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने बुधवारी संबंधित नागरिकांना अंतिम सूचना देत, गुरुवारपर्यंत अतिक्रमणे हटवली नाहीत तर जेसीबीच्या सहाय्याने थेट कारवाई केली जाईल, असा इशारा दिला.
त्यामुळे महापालिकेच्या कारवाईची वेळ येऊ नये, तसेच शहराच्या विकासकामांना हातभार लागावा या उद्देशाने अनेक नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी दुकानांसमोरील ओटे तोडण्यात आले, तर काहींनी शेड आणि पत्रे हटवली. नागरिकांच्या या सहकार्यामुळे प्रशासनाचा वेळ आणि खर्च वाचला असून, रखडलेले रस्ता रुंदीकरणाचे काम आता वेग घेण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, रस्ता रुंदीकरण पूर्ण झाल्यानंतर रोशन गेट परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास महापालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या आठ डीपी रस्त्यांचे रुंदीकरण
चंपा चौक ते जालना रोड, मुख्य रस्ता ते विधी विद्यापीठ, कांचनवाडी, दिल्लीगेट ते हर्सल टी-पॉइंट, हसूल टी-पॉइंट ते सावंगी, सेव्हनहिल ते रेणुकामाता परिसर सातारा, कांचनवाडी भाजीवालीबाई पुतळा, (गट क्रमांक ४३), नक्षत्रवाडी ते धुळे-सोलापूर महामार्ग.