Jewelry worth 8 tolas stolen from elderly man's bag during ST journey
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटी बसमध्ये गर्दी असल्याने कडेवर बाळ घेऊन उभा असलेल्या महिलेला जागा देणे वृद्धाला महागात पडले. महिलेने बाळाची खेळणी पडल्याचा बहाणा करून बॅगमधील ८ तोळ्यांचे दागिने लंपास केले. हा प्रकार सोमवारी
(दि.१०) सकाळी १० वाजेच्या सुमारास बिडकीन ते हसूल टी पॉइंट दरम्यान घडला. फिर्यादी श्रीकांत झिरपे यांच्या पत्नी मीनाबाई त्यांच्या मुलीला भेटण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथून संभाजीनगर बसमध्ये बसल्या होत्या. बिडकीन येथे गाडी थांबल्यावर त्यांच्या मागच्या व शेजारच्या सीटवर चार महिला बसल्या.
त्यातील एका महिलेच्या कडेवर बाळ असल्याने त्यांनी तिला जागा दिली. काही वेळाने मुलाची खेळणी पडली म्हणून ती महिला खाली वाकली. तिने मीनाबाईची मागच्या बाजूला बॅग लोटली. याबाबत त्यांनी महिलेला जाबही विचारला. मात्र थोडा वाद घालून त्या महिलांनी वेळ मारून नेली.
बॅग पाठीमागे सरकताच मागे बसलेल्या महिलेने त्यातील सोने काढून घेतले. त्यानंतर बसमधून उतरून मीनाबाई मुलीच्या घरी पोहोचल्या. त्यांनी बॅग उघडताच त्यांना धक्का बसला. दागिने ठेवलेला स्टीलचा डब्बा दिसून आला नाही. याप्रकरणी अज्ञात चार महिलांविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो हसूल ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.