Jewelery worth 15 tolas looted after breaking into a house in Jawaharnagar
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा रामचंद्रनगरमधील घरफोडीच्या मालिकेत आणखी एक नोंद झाली आहे. रामचंद्रनगरमध्ये भरदिवसा झालेल्या मोठ्या घरफोडीने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून अंदाजे १४ ते १५ तोळे सोने आणि ३० हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना घडली.
रामचंद्रनगरमधील संस्कारमित्र अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या पूजा धनंजय जोशी (३८, रा. संस्कारमित्र अपार्टमेंट, अमृत बाल रुग्णालयाच्या पाठीमागे) यांच्या घरात दुपारच्या सुमारास ही घरफोडी झाली. पूजा या पती, सासू सासरे आणि आपल्या दोन मुलींसह तेथे रहातात. पूजा आणि त्यांचे पती धनंजय जोशी हे दोघेही खासगी नोकरी करतात.
धनंजय जोशी हे नोकरीच्या कामानिमित्त नेहमी बाहेर राज्यात दौऱ्यावर जात असतात. दोन दिवसांपूर्वी पूजा यांच्या सास-यांच्या छातीत खूप त्रास होत असल्याने त्यांना एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांची सासूही रुग्णालयात होत्या. त्यामुळे पूजा यांनी आपल्या दोन्ही मुलींना माहेरी सोडले होते. १६ जून रोजी सकाळी पूजा या नेहमीप्रमाणे कामाला गेल्या होत्या. तर त्यांच्या सासू दुपारी १२ वाजेच्या सुमारास घराला कुलूप लावून डबा घेऊन रुग्णालयात गेल्या होत्या.
सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पूजा या कामावरून घरी परतल्या असता त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच कपाटातील सामान विखुरलेले दिसले. तसेच कपाटातील १५ तोळे दागिने आणि ३० हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले. त्यांनी तात्काळ भावाच्या मदतीने जवाहरनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला.
घटनेची माहिती मिळताच सहाय्यक आयुक्त रणजीत पाटील, निरीक्षक अशोक शेरमाळे यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी रवाना झाला होता. तसेच श्वानपथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. दरम्यान, घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून, वृत्त देईपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
जवाहरनगर ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विष्णूनगरातही भाच्याच्या लग्नासाठी उदगीर येथे गेलेले शिवाजी मुरलीधर वाकळे (३७, रा. गल्ली क्र. ५, विष्णूनगर) यांचे घर फोडून चोराने दीड तोळ्याचे सोन्याचे दागिने, २२ तोळे चांदीचे दागिने, रोख १५ हजार असा ९४ हजारांचा ऐवज लंपास केला. ही घटना ५ जून रोजी उघडकीस आली. मात्र याप्रकरणी सोमवारी (दि.१६) जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.