Jayakwadi water storage at 43.91 percent
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा नाशिक, नगर जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची हजेरी सुरू आहे. त्यामुळे वरचे मोठे प्रकल्प ओव्हर फ्लो झाले आहेत. त्यामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक १ लाख क्युसेकच्या जवळपास पोहचली असून जलसाठा ३१.५२ हून ४३.९१ टक्क्यांवर पोहचला आहे. चार दिवसांत १२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
यंदा मान्सूनचा पहिला महिना कोरडा गेला आहे. त्यानंतर जुलैमध्ये पावसाचे दमदार अगमन झाले आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसत आहे. परंतु, मराठवाड्याला अजूनही मोठ्या पावसांची प्रतीक्षा आहे.
त्यात मराठवाड्याचा तारणहार असलेल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी ३१ टक्क्यांवर आली असतनांच नगर आणि नाशिक येथील वरच्या धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आला आहे. मागील चार दिवसांपासून धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. महिनाभर पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या जायकवाडीत शनिवारी सायंकाळी ८५ हजार ७२७क्युसेक क्षमतेने पाण्याची आवक सुरू होती.
दरम्यान, चार दिवसांपासून पाण्याची आवक मोठ्याप्रमाणात सुरू आहे. त्यामुळे वैजापूर, गंगापूर गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच धरणाची पाणी पातळी देखील आता ३१ टक्क्यांहून ४३.९१ टक्क्यांवर म्हणजेच १२ टक्क्यांनी वाढली आहे. आवक पुढील आठवडाभर अशीच सुरू राहिल्यास धरण ६० टक्क्यांच्या पुढे जाईल, असे धरण प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.