Jayakwadi Dam pudhari photo
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar News : रब्बीसाठी जायकवाडीतून तीन, नांदूर-मधमेश्वरमधून दोन आवर्तने!

विखे पाटील यांचे निर्देश; ५ नोव्हेंबरपासून जायकवाडीतून पाणी सोडणार

पुढारी वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती आणि रब्बी हंगामातील पिकांची पाण्याची गरज लक्षात घेऊन जायकवाडी प्रकल्पातून रब्बीसाठी ३ आणि उन्हाळी एक असे चार, तर नांदूर मधमेश्वर प्रकल्पातून रब्बीसाठी २ आणि उन्हाळी एक असे तीन आवर्तने देण्याचा निर्णय सोमवारी (दि. २) विभागीय आयुक्त कार्यालात झालेल्या बैठकीत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार येत्या ५ नोव्हेंबरपासून जायकवाडीच्या डाव्या-उजव्या कालव्यातून तर २० नोव्हेंबरपासून नांधूर मधमेश्वरमधून पाणी सोडण्यात येईल, असे जलसंपदामंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

यावेळी खा. संदीपान भुमरे, आ. प्रशांत बंब, अंबादास दानवे, जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी विनय गौडा, गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक जयंत गवळी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यात मंत्री विखे पाटील यांनी जायकवाडी, नांदूर मधमेश्वरसह इतर धरणांमधील पाणी पातळी आणि बाष्पीभवनसह इतर सर्व बाबींची माहिती घेतली.

रब्बी व उन्हाळी हंगामातील सिंचनाचे नियोजन, पाण्याची उपलब्धता, पिण्याच्या पाण्याचे आरक्षण आणि आवर्तनांच्या कालावधीबाबत चर्चा करण्यात आली. दुष्काळी परिस्थितीमुळे जमिनीतील ओलावा कमी झाला असून, पिकांना वेळेत पाणी मिळणे आवश्यक असल्याची भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडली. त्यानुसार जायकवाडीच्या पहिल्या आवर्तनाची तारीख १५ नोव्हेंबरऐवजी ५ नोव्हेंबर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

आवर्तनाचे नियोजन असे...

जायकवाडीतून पहिले आवर्तन ५ नोव्हेंबरपासून सुरू होईल. दोन आवर्तनांतील अंतर १५ दिवस अथवा आवश्यक वाटल्यास तीन आठवडे राहणार आहे. नांदूर-मधमेश्वरमधून पहिल्या आवर्तनासाठी २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत २ टीएमसीपर्यंत पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. दुसरे आवर्तन १९ फेब्रुवारी ते १२ मार्च २०२७ या कालावधीत १.३५५ टीएमसी पाण्याचे प्रस्तावित आहे.

जायकवाडीतून २२.०७ टीएमसीचे नियोजन

जायकवाडी प्रकल्पाच्या पैठण डाव्या व उजव्या कालव्यांसाठी रब्बी हंगामात प्रत्येकी तीन आणि उन्हाळी हंगामात प्रत्येकी एक, अशी एकूण चार आवर्तने प्रस्तावित आहेत. या नियोजनानुसार रब्बीसाठी १७.४८ टीएमसी, तर उन्हाळी हंगामासाठी ४.५९ टीएमसी, असे एकूण २२.०७ टीएमसी पाणी वापरण्याचे नियोजन आहे. रब्बी हंगामात सुमारे ५८ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT