Jayakwadi has only enough water storage to last for the entire year
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात यंदाच्या मान्सूनात पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे ग्रामीण भागात काही ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पुरविण्याची वेळ येणार आहे. परंतु, जायकवाडीवर अवलंबून असलेल्या महापालिका हद्दीतील नागरी वसाहतींसह एमआयडीसीतील कंपन्यांना वर्षभर पुरेल एवढे पाणी धरणात उपलब्ध आहे. अगदी बाष्पीभवन झाल्यानंतरही रब्बीसाठी एक अवर्तन देण्याचे नियोजन आहे, असा विश्वास जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी यांनी व्यक्त केला आहे.
अलनिनोमुळे यंदा सर्वत्र पावसाचे प्रमाण कमीच राहिले आहे. परंतु, असे असतानाही जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली असून त्यानंतर सिल्लोडचा समावेश आहे. परतु, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये खंडकाळ अधिक राहिल्यामुळे या तालुक्यांचा समावेश ट्रिगर-१ व २ मध्ये झाल्याचे जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले. शिवाय, नगर, नाशिकमध्ये पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने तेथील धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे जायकवाडी धरण ९४ टक्क्यांपर्यंत भरले होते. धरणाच्या पाण्याचे सध्या ऑक्टोबर बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे.
दरम्यान, या बाष्पीभवनानंतरही येत्या जूनअखेरपर्यंत जायकवाडी धरणात पाणी उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि शहरालगतच्या सर्व औद्योगिक वसाहतींना वर्षभर पुरेल एवढे पाणी धरणामध्ये असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला, जिल्ह्यात पैठण, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, फुलंब्री, कन्नडमधील काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी वाढेल. परंतु, त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने तयारी केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
मनपा जलवाहिनीतून पाणी पैठणमधील १६ गावांना महापालिकेच्या ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जाईल. त्यादृष्टीने मनपा, एमजेपी यांच्याकडून नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी
जीपीएस सेवा आवश्यक पाण्याची मागणी झाल्यानंतर टँकर सुरू करण्यापूर्वी त्यावर जीपीएस आहे का, गावात जलस्त्रोत आहे का, विहिरी जवळ आहे का, यासर्वच बाबींचा अभ्यास करून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल. दैनंदिन फेऱ्या, किती पाणी दिले, याबाबतचा दैनंदिन हिशेब ठेवला जाईल, असेही जिल्हाधिकारी गौडा यांनी सांगितले.
वर्षभर ६ टीएमसीच पाणी लागते
महापालिका हद्दीतील वसाहतींसह एमआयडीसीतील कंपन्यांना वर्षाला ५ ते ६ टीएमसी पाणी लागते, धरणात सध्या ७६ टीएमसी जलसाठा उपलब्ध आहे. शिवाय, २६ टीएमसी एवढा धरणाचा राखीव मृतसाठा आहे. त्यामुळे शहराला वर्षभर पूर्ण क्षमते पाणीपुरवठा होईल.