छत्रपती संभाजीनगर : शहरवासीयांसाठी २७४० कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजन-`चा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे आला आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, १९ मार्चपासून जायकवाडी धरणातून जॅकवेलमध्ये (उपसा विहीर) पाणी घेण्यास सुरुवात होणार आहे. हा मुहूर्त यशस्वी करण्यासाठी प्रशासनाने आता शेवटच्या चार दिवसांत युद्धपातळीवर कामे हाती घेतली आहेत.
न्यायालय नियुक्त समितीच्या आढाव्यानुसार, १९ मार्चला जॅकवेलमध्ये सायफन पद्धतीने पाणी घेण्यात येईल. त्यानंतर जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ३९ किलोमीटरच्या मुख्य २५०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीच्या स्वच्छतेचे (फ्लशिंग) काम केले जाणार आहे.
जलवाहिनी टाकताना आणि व्हॉल्व्ह बसवताना निर्माण झालेली माती व कचरा पाण्याद्वारे स्वच्छ करण्यासाठी किमान २० ते २५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. या प्रक्रियेनंतर एप्रिलमध्ये नक्षत्रवाडीतील नव्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचेल.
योजनेच्या अंमलबजावणीत समोर आलेल्या पॅकिंग चेअरच्या बांधकामातील तड्यांची दखल घेत, कंत्राटदार कंपनीने दुरुस्तीचे काम पूर्णत्वाकडे नेले आहे. सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी आणि कंत्राटदार कंपनीचे प्रतिनिधी पैठण येथे तळ ठोकून असून, प्रत्येक तांत्रिक बाबीची बारकाईने तपासणी केली जात आहे.
दुसरा टप्पा महत्त्वाचा
जॅकवेलमध्ये पाणी घेण्यापेक्षा, ते जलवाहिनीद्वारे नक्षत्रवाडीच्या दिशेने ढकलणे हा दुसरा टप्पा अधिक आव्हानात्मक आहे. या प्रक्रियेत जलवाहिनीने पाण्याचा दाब (प्रेशर) यशस्वीपणे सहन केल्यास, आगामी मे महिन्यात शहरवासियांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार नाहीत, असा विश्वास प्रशासकीय यंत्रणांनी व्यक्त केला आहे.