Jayakwadi dam water release
छत्रपती संभाजीनगर : दोन दिवसांपूर्वी जायकवाडी धरणातून विक्रमी असा ३ लाख ६ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग करण्यात आला. आता हे पाणी सुमारे तीनशे किलोमीटरचा पल्ला पार करुन मंगळवारी (दि.३०) रात्री उशीरापर्यंत नांदेडात पोहचणार आहे. पाण्याचा हा लोंढा पुढील वीस तासापर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठावरील गंगाखेड, नांदेडसह १९८ गावांसाठी पुढील वीस तास पूरस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणातून गेल्या आठवड्यापासून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात येत आहे. शिवाय मराठवाड्यातही रविवारपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे नांदेडसह विविध भागात आधीच पूरस्थिती तयार झाली आहे. आता पाऊस थांबला असला तरी जायकवाडीतून दोन दिवसांपूर्वी झालेला मोठ्या प्रमाणावर सोडलेले पाणी नांदेडपर्यंत पोहचणार आहे.
जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता सुनंदा जगताप आणि अधिक्षक अभियंता समाधान सब्बीनवार यांनी सांगितले की, जायकवाडीतून रविवारी रात्री ३ लाख ६ हजार क्युसेकपर्यंत पाणी सोडले होते. तो विसर्ग नंतर कमी करण्यात आला. सध्याही पावणे दोन लाख क्युसेकपर्यंत विसर्ग सुरू आहे. रविवारी रात्री सोडलेले पाणी आज मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत नांदेडपर्यंत पोहचणार आहे. त्यामुळे पुढील काही काळ तेथे नदीपात्र फुगलेले राहिल. नांदेडमधील विष्णूपुरी धरणातून खाली १ लाख ३९ हजार क्युसेकने पाणी सोडले जात आहे. पुढील काळात तेथील विसर्ग गरजेनुसार वाढविला जाईल. तरीदेखील नदीकाठावरील १९८ गावांनी काळजी घेणे गरजेचे आहे.