

Jayakwadi dam discharge
पैठण : नाथसागर धरणात वरच्या धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरू असल्याने रविवारी (दि.२८) दुपारी पाटबंधारे विभागाने धरणातून गोदावरी नदीत तब्बल २ लाख २६ हजार ३६८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला. या विसर्गामुळे श्रीसंत एकनाथ महाराज समाधी मंदिराच्या पाठीमागील दशक्रिया विधी घाट पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, नागरिकांना इतरत्र दशक्रिया विधी करण्याची वेळ आली आहे.
२००६ मध्ये निर्माण झालेल्या पूरस्थितीसारखीच परिस्थिती उद्भवेल का, अशी भीती नदीकाठावरील रहिवाशांत निर्माण झाली आहे. धरणातून सुरू झालेला प्रचंड पाण्याचा विसर्ग पाहण्यासाठी पर्यटक आणि स्थानिक नागरिकांनी पैठण येथे मोठी गर्दी केली. या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सायंकाळपर्यंत धरणातून अडीच लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्याचे नियोजन असून, संभाव्य पूरस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्कालीन तयारी केली आहे. उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसीलदार ज्योती पवार, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे व नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे यांच्या उपस्थितीत पाण्यात पोहणाऱ्या पथकासह यंत्रणांचा सराव घेण्यात आला.
दरम्यान, गोदावरी नदीच्या पूरस्थितीची पाहणी जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, आमदार विलास बापू भुमरे, उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, पोलीस उप अधीक्षक सुनील पाटील, पोलीस निरीक्षक महादेव गोमारे, तहसीलदार ज्योती पवार, नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. पल्लवी अंभोरे, कार्यकारी अभियंता प्रशांत संत, धरण उपअभियंता मंगेश शेलार यांनी करत पूर परिस्थितीचा आढावा घेतला. स्थानिक प्रशासनास सतर्कतेच्या योग्य त्या सूचना दिल्या आहे.