सोमनाथ गोरखनाथ जाधव 
छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar jawan funeral|आईच्या कष्टाचे स्वप्न अधुरेच! जवान सोमनाथ जाधव यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अखेरचा सलाम!

छत्रपती संभाजीनगर- जुने कायगाव टोका येथील श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर परिसरात अंत्यसंस्कार

पुढारी वृत्तसेवा

गंगापूर (छत्रपती संभाजीनगर) : देशसेवेचे कर्तव्य बजावण्यासाठी निघालेल्या जवान सोमनाथ गोरखनाथ जाधव (वय ३२) यांच्यावर काळाने घाला घातला. येवला–वैजापूर मार्गावरील अपघातात त्यांचा मृत्यू झाला. मंगळवारी (ता. १३) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास कायगाव टोका येथील श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर परिसरात शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गंगापूर पोलिसांनी हवेत फैरी झाडून या वीर जवानाला मानवंदना दिली. तर माजी सैनिकांनी श्रद्धांजली अर्पण केली. देशसेवेसाठी आयुष्य वाहिलेल्या जवानाला अखेरचा निरोप देताना उपस्थितांचे डोळे पाणावले.

कर्तव्यावर रुजू होण्यासाठी निघाले अन् काळाचा घाला

सोमनाथ जाधव हे सुट्टी संपवून कर्तव्यावर रुजू होण्यासाठी मनमाड रेल्वेस्थानकाकडे दुचाकीने निघाले होते. सोमवारी (ता. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास येवला–वैजापूर मार्गावरील नांदगाव फाट्याजवळील पुलावर त्यांच्या दुचाकीला ट्रकने जोराची धडक दिली.

या भीषण अपघातात दुचाकी ट्रकखाली गेल्याने सोमनाथ जाधव यांच्यासह त्यांना मनमाडला सोडण्यासाठी निघालेले हिरामण गिरीजाराम माळी (वय ४३, रा. वडगाव, ता. गंगापूर) यांचाही मृत्यू झाला. दोघांना तातडीने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आईच्या कष्टातून घडला देशसेवक

सोमनाथ जाधव यांचा जीवनप्रवास संघर्ष आणि जिद्दीचा होता. अमळनेर येथील आदिवासी समाजातून सैन्यात भरती होणारे ते पहिले युवक होते. सुमारे आठ वर्षांपूर्वी सैन्यात भरती होऊन त्यांनी देशसेवेचा मार्ग स्वीकारला. प्रतिकूल परिस्थितीत त्यांच्या आईने मोलमजुरी करून त्यांना घडवले आणि सैन्यात भरती होण्याचे त्यांचे स्वप्न साकार केले. मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी सैन्यात स्थान मिळवले होते. उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणूनही त्यांची ओळख होती.

सोमनाथ हे आई-वडिलांचे एकुलते एक अपत्य होते. त्यांच्या पश्चात आई आणि पत्नी असा परिवार आहे. मुलाने सैन्यात भरती होऊन कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले; मात्र कर्तव्यावर रुजू होण्यासाठी निघालेल्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अमळनेर गावावर शोककळा

सोमनाथ जाधव यांच्या निधनाची वार्ता समजताच अमळनेर गावासह परिसरात शोककळा पसरली. आईच्या कष्टातून घडलेला, जिद्दीने सैन्यात भरती झालेला आणि देशसेवेचे व्रत स्वीकारलेल्या जवानाच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT