छत्रपती संभाजीनगर : अयोध्येतील श्रीराम मंदिराचा दैनंदिन कारभार अधिक सुरळीत करण्यासाठी विश्वस्त मंडळाने जगदीश आफळे या मराठमोळ्या व्यक्तीची श्रीराम जन्मभूमी ट्रस्टच्या सचिवपदी नियुक्ती करण्याचे ठरवले आहे. आफळे हे मूळचे पुण्याचे असले, तरी छत्रपती संभाजीनगरातील बजाज कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून त्यांनी प्रदीर्घ सेवा बजावली आहे. संघाच्या विविध जबाबदाऱ्याही त्यांनी शहरात असताना सांभाळल्या आहेत.
संभाजीनगर जिल्ह्यातील संघवर्तुळात 'आफळे काका' या नावाने सुपरिचित असणारे आफळे जवळपास तीस वर्षे शहरात वास्तव्यास होते. युवकांमध्ये लोकप्रिय असणाऱ्या आफळे यांनी संघात जिल्हा शारीरिक शिक्षण प्रमुख व अन्य जबाबदाऱ्या सांभाळल्या.
वाळूज, बजाजनगर हा भाग विकसित होत असताना त्यांच्यावर वाळूजचे 'नगर संघचालक' अशी जबाबदारीही सोपवण्यात आली होती. श्रीराम मंदिर निर्माण कार्य सुरू झाल्यापासून आफळे व त्यांच्या पत्नी माधुरी या अयोध्येत कार्यरत असून, संभाजीनगर येथील कार्यकर्ते जगन्नाथ गुळवे आणि सुभाष चौधरी हे दोघेही तेथे सेवाव्रती म्हणून काम करत आहेत.
आफळे यांच्या या नियुक्तीबद्दल विश्व हिंदू परिषदेचे मंदिर संपर्क आयाम प्रमुख राजीव जहागीरदार यांनी आनंद व्यक्त केला. 'पुढारी'शी बोलताना ते म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छत्रपती संभाजीनगरच्या शहर टीममध्ये त्यांच्यासोबत मी काम केले आहे. बजाज कंपनीत मोठ्या पदावर नोकरी असताना संघटनेसाठी वेळ कसा काढला पाहिजे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे जगदीश आफळे होय."
श्रीराम जन्मभूमीवरील मंदिराचे काम जेव्हापासून सुरू झाले, तेव्हापासून आफळे प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून तेथे काम करत आहेत. आफळे हे इलेक्ट्रिकल इंजिनिअर असून त्यांनी मुंबई आयआयटीमधून बी.टेक. आणि एम.टेक. या पदव्या प्राप्त केल्या आहेत. अमेरिकेत मोठ्या कंपनीत उच्च पदावर काम केल्यानंतर ते भारतात येऊन बजाज कंपनीत रुजू झाले. श्रीराम जन्मभूमी बांधकामात कोणतेही मानधन न घेता त्यांनी जी मेहनत घेतली आणि काम उभे केले, त्याचेच फळ त्यांना मिळाले, असे जहागीरदार यांनी सांगितले. आफळे यांचे संभाजीनगरात निवासस्थान असून, गतवर्षी त्यांच्या अनुभवकथनाचा कार्यक्रमही झाला होता.